spot_img

नुकसानग्रस्त २२ जिल्ह्याच्या यादीतून अमरावती जिल्ह्याला वगळले

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं नुकसान झालेल्या 22 जिल्ह्यांच्या प्राथमिक यादीतून अमरावती जिल्हा वगळण्यात आला आहे.
या प्रकारामुळं काँग्रेस नेत्या आमदार अॅड.यशोमती ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शुक्रवारी (ता. 1) या प्रकारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जबाबदार धरले. दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्यांना लांबच्या जिल्ह्यांचं पालकत्व दिलं की असंच होणार, असं ठाकूर म्हणाल्या.
सरकारचं शेतकऱ्यांकडं पूर्ण दुर्लक्ष आहे. संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. सरकारनं 22 जिल्ह्यातील प्राथमिक नुकसानीची आकडेवारी अहवालात दिली आहे. परंतु त्यात अमरावती जिल्ह्याचा समावेशच नाही. अमरावतीला वगळण्यात आलं, असं ठाकूर म्हणाल्या.

राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये 3 लाख 93 हजार 325 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. वस्तुस्थिती हा आकडा बराच मोठा आहे. प्रशासनानं जाहीर केलेल्या यादीत पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोलीचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्याला यातून का वगळ्यात आलं, असा सवालही त्यांनी केला. अमरावती जिल्ह्यातील पंचनाम्यांची कार्यवाही अद्याप अपूर्ण आहे का? ती पूर्ण झाली नसेल तर प्रशासनावर मंत्र्यांचा कोणता वचक आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अमरावतीचं दुर्दैव आहे की, जिल्ह्याला दूरवरचे पालकमंत्री मिळाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील सगळ्याच गोष्टींकडं दुर्लक्ष करीत आहेत. अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक नाही. अशात मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळं शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का, अशीच सरकारची इच्छा आहे का? असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न विचारणार असल्याचंही आमदार अॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. मदत न मिळाल्यामुळं अमरावती जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या झाली, तर आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

काँग्रेसही राज्यातील पिकांच्या हानीची माहिती घेत आहे. सरकारजवळ शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही. त्यामुळं ते थातूरमातूर पंचनामे करून एखादं पॅकेज देऊन मोकळं होऊ शकते. आम्हीही नुकसानीची माहिती घेतोय. त्यात मोठी तफावत आढळल्यास आम्ही सरकारला योग्य त्या प्रमाणात नुकसानभरपाई देण्यास बाध्य करू, असंही आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!