संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय प्रथम पुरस्काराचे मानकरी
◆नागपूरच्या इग्नो रीजनल सेंटरने पटकावला द्वितीय पुरस्कार
◆डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा
◆मिररवृत्त
◆अमरावती
डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या प्रथम पुरस्काराचे मानकरी या वर्षी संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय ठरले.तर द्वितीय पुरस्कार नागपूर येथील इग्नोरिजनल सेंटरच्या विद्यार्थ्यांनी पटकावला. दोन्ही चमुला फिरता चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात 15 फेब्रुवारी रोजी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादत पार पडली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महाविद्यालयीन उपकुलसचिव डॉ. मीनल मालधुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.अमर देशमुख होते. तर मुख्य अतिथी म्हणून उच्चशिक्षण सहसंचालक डॉ उमेश काकडे , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ऍड. जी आर.पाटील होते. यावेळी व्यासपीठावर ऍड.राजीव इंगोले प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख,गोपाल उताणे,प्रा.रामटेके यांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे संचालन डॉ. राधिका देशमुख तर आभार प्रदर्शन डॉ. नंदकिशोर रामटेके यांनी केले. एक देश एक निवडणूक देश हिताची आहे, या विषयावर झालेल्या वादविवाद स्पर्धेत विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती फिरता चषक प्रथम पुरस्काराचा मानकरी संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचा संघ ठरला. या संघातील ऐश्वर्या तनपुरे,सौरभ औटे यांना रोख सात हजार रुपये, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील इग्नो रीजनल सेंटरच्या रितेश तिवारी व आशुतोष तिवारी यांच्या संघाला रोख पाच हजार रुपये प्रमाणपत्र आणि द्वितीय क्रमांकाचा चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक सपना इंजिनिअरिंग कॉलेजच्या खुशी कावनपुरे व श्रेया ठाकूर यांच्या संघाला देण्यात आले. वैयक्तिक गटात कृष्णा नरवाडे, रफिया फिरदोस, व भाग्यश्री हरणे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त केले.
बक्षीस वितरण समारंभाला आयएएस अकॅडमीच्या संचालिका संगीता पकडे उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून डॉ.वर्षा गावंडे,नीता होनराव, हरिष निंबाळकर उपस्थित होते. स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून गोपाल उताणे यांनी काम पाहिले.बक्षीस वितरणाचे संचालन डॉ. नीता देसाई यांनी तर आभार प्रदर्शन मधुरा कुलकर्णी यांनी केले. संयोजन समितीतील सदस्य उदय ठाकरे,प्रा.लोखंडे, प्रा.काळे, प्रफुल्ल घवळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले.