अंबानगरी अमरावतीत रंगणार ‘महासंस्कृती महोत्सव’
◆आज शानदार उदघाटन,महोत्सवातविविध कार्यक्रमांची मेजवानी
◆मिररवृत्त
◆अमरावती
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि गौरवशाली इतिहास लाभलेल्या अंबानगरी अमरावतीत पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग,महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवात १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सांस्कृतिक व रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी अमरावतीकरांना मिळणार आहे.या महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन आज दि.१८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
अमरावती शहरातील सायन्सकोर मैदान येथे होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या उदघाटन समारंभास दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आ.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, लोकसभा सदस्य खा. श्रीमती नवनीत रवी राणा, खा. रामदास तडस, विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण पोटे पाटील, आ. किरण सरनाईक, आ.धीरज लिंगाडे,विधानसभा सदस्य आ. ऍड.श्रीमती यशोमती ठाकूर, आ. रवी राणा, आ. सौ. सुलभा खोडके,आ. राजकुमार पटेल, आ. बळवंत वानखडे, आ. प्रताप अडसड, आ.देवेंद्र भुयार, अमरावती विभागीय आयुक्त डॉ.निधी पांडेय आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थीती राहणार आहे.
महासंस्कृती महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमास तसेच पाच दिवस आयोजित विविध सांस्कृतिक व रंगारंग कार्यक्रमास अमरावतीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक डॉ. विभीषण चवरे तसेच जिल्हा महासंस्कृती महोत्सव आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
●आज प्रसिद्ध गायक सुदेश भोसले संगीत रजनी●
अंबानगरी अमरावतीत आयोजित महासंस्कृती महोत्सवामध्ये आज १८ फेब्रुवारी रोजी सायन्सकोर मैदान येथे सायंकाळी ५ ते ६ या वेळात अमरावती मधील स्थानिक कलाकारांचे ढोल ताश्यापथक आपली कला सादर करणार आहे. त्यानंतर होणाऱ्या उदघाटन समारंभानंतर प्रसिद्ध गायक सुदेश भोसले हिंदी व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर गायक सुदेश भोसले यांचा महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने अमरावतीत प्रथमच कार्यक्रम होत असून त्यांचे गायन ऐकण्याची संधी अमरावतीकरांना मिळणार आहे हे विशेष. रविवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत आयोजित या विविध कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महासंस्कृती महोत्सव आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
●स्थानिक कलाकारांना कला सादर करण्याची संधी●
महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. निःशुल्क प्रवेश असलेल्या या महोत्सवात स्थानिक कलाकारांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलाकारांचे विविध बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. यासोबतच बचतगटांची प्रदर्शनी तसेच विविध खाद्य संस्कृतीची मेजवानी अमरावतीकरांना मिळणार आहे.