अज्ञात मनोविकृताने तुरीच्या गंजीला आग लावून शेकडो पपईची झाडे कापली
कीटकनाशक,स्प्रिंकलर पाईप विहिरीत फेकले
■पोलिसांत गुन्हा दाखल, पावणेदोन लाखांचे नुकसान
■मिररवृत्त
■नांदगाव पेठ
अज्ञात मनोविकृताने एका शेतातील तुरीच्या गंजीला आग लावून बाजूच्या शेतातील पपईची शेकडो झाडे कापून फेकली तसेच शेतातील कीटकनाशक औषध,स्प्रिंकलर पाईप सुद्धा विहिरीत टाकून शेतकऱ्यांचे पावणेदोन लक्ष रुपयांचे नुकसान केले.रविवारी मध्यरात्री संगमेश्वर शेतशिवारात ही घटना घडली.घटनेची नांदगाव पेठ पोलिसांनी नोंद केली असून त्या मनोविकृताचा पोलीस शोध घेत आहे.
कोकिळा रमेशराव साकोरे (४७) रा.संगमेश्वरपुरा नांदगाव पेठ,संजय मुळे (५०) बारीपुरा नांदगाव पेठ असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. कोकिळा साकोरे यांचे संगमेश्वर शेतशिवारात शेती असून यांच्या शेतात तुरीची गंजी झाकून ठेवण्यात आली होती.शनिवारी मध्यरात्री अज्ञात मनोविकृताने गंजीला आग लावून शेतात असलेले कीटकनाशक औषधी विहिरीत टाकून दिली तर संजय मुळे यांच्या शेतात लावलेले पपई चे शेकडो झाले कुऱ्हाडीने तोडून स्प्रिंकलर पाईप विहिरीत फेकून दिले.यामध्ये शेतकऱ्यांचे पावणे दोन लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोमवारी पहाटे शेतकरी मनोज हटवार शेतात गेले असता त्यांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी तातडीने शेतमालक आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. पो.उ.नि मोहन चोखट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि ४३५,४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास मोहन चोखट करत आहे.