spot_img

विधिमंडळात गाजणार अमरावती मनपाचा भ्रष्टाचार

विधिमंडळात गाजणार अमरावती मनपाचा भ्रष्टाचार

● विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा तारांकित प्रश्न

● शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या तक्रारींची दखल

● मिररवृत्त
● अमरावती

7 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अमरावती महानगरपालिकेचा भ्रष्टाचार गाजण्याची चिन्ह आहेत .अमरावती मनपा प्रशासन आणि तत्कालीन आयुक्तांनी केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे .
अमरावती मनपाचे आयुक्त व तत्कालीन प्रशासक यांनी विकासक आणि कंत्राटदारांशी हात मिळवीत मनपामध्ये नियमबाह्य पद्धतीने विविध ठराव पारित केले .ठराव पारित करताना त्याची प्रोसिडिंग बुक मध्ये नोंद घेण्यात आली नाही. ठरावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामाच्या वर्क ऑर्डर व करारनामा नियमांना फाटा देत करीत तसेच अटी व शर्ती बदलून विकासक व कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्याचा प्रकार मनपात घडला आहे. परिणामी अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या मनपाला करोडो रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी करीत मुख्यमंत्री तसेच नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार केली आहे होती.
अमरावती शहराचे वैभव असलेल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराला फायदा पोहोचविण्याच्या उद्देशाने मनपाचे तत्कालीन प्रशासक यांनी करारनाम्यात मोठा बदल करीत मनपाचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे तसेच नवसारी सर्वे क्रमांक 29 ही जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव असताना देखील तत्कालीन मनपा प्रशासक आणि संबंधित अधिकारी यांनी आरक्षणात बदल न करता बीओटी तत्त्वावर ही जागा स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी देत तो प्रस्ताव मंजूर करीत परस्पर करारनामा केला. मनपाच्या प्रशासकीय इमारतीवर दिनाचे शेड टाकून कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. या कामावर करोडो रुपयांची उधळपट्टी करीत तब्बल आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.. वास्तविक पाहता एवढ्या रकमेत नवीन इमारत उभी झाली असती. मनपा आयुक्त यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती व रंगरोटीसाठी एक कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले आहे .प्रत्यक्षात मात्र केवळ बिलासाठी या कामाचा गाजावाजा करण्यात आल्याचे सुनील खराटे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे .या सोबतच कंपोस्ट डेपोसाठी करण्यात आलेली 17 कोटी रुपयांची निविदा आणि नवाथे मल्टिप्लेक्स साठी करण्यात आलेली निविदा या दोन्ही निविदेत त्रुट्या असताना विकासकाला लाभ पोहोचविण्यासाठी नियमबाह्य काम केल्याचे अनेक मुद्दे सुनील खराटे यांनी मुख्यमंत्री व संबंधितांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या सर्व भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुनील खराटे यांनी तक्रारीतून केली आहे.

■ अहवाल सादर करण्याचे आदेश ■
विधान परिषद सदस्य व राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमरावती मनपा व तत्कालीन प्रशासक यांनी केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. या अनुषंगाने सविस्तर पूरक टिपणी व आवश्यक कागदपत्रांसह आपला अहवाल पाठविण्याचे आदेश नगर विकास विभागाने मनपा आयुक्तांना एका पत्राद्वारे दिले आहे.

■ त्या प्रशासकावर सरकारचा वरदहस्त ■
गेल्या दोन वर्षात तत्कालीन मनपा प्रशासकाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करीत आर्थिक संकटातील अमरावती मनपाला पुन्हा मोठ्या आर्थिक गर्तेत टाकले आहे. या प्रशासकाच्या कारनाम्यांची तक्रार मुख्यमंत्री तसेच नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली असता त्याची दखल घेण्यात आली नाही .त्या प्रशासकावर सरकारचा वरदहस्त असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारकर्ते शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!