spot_img

अवकाळी गडगडाट व झडीच्या हजेरीने हुडहुडी

अवकाळी गडगडाट व झडीच्या हजेरीने हुडहुडी

पारा १८ डिग्रीवर, आणखी ३ दिवस बरसणार

रब्बीसाठी पोषक पण पांढरे सोने काळे होण्याची भीती

अमरावती दि. २७ : रविवारच्या मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याच्या भाकितानुसार रविवारी रात्री उशिरा अचानक गडगडाटासह विजा चमकल्या अन पाऊस सुरु झाला. रविवारच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाची ही अखंड रीप-रीप सोमवारी दुपारपर्यंत सुरूच होती. परिणामी वातावरणाचा पारा झपाट्याने उतरून १८ डिग्रीवर स्थिरावला. अवकाळी गडगडाट व झडीचीच्या हजेरीने जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना झाला असला तरी हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक तर काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या कापूस पिकासाठी मात्र धोक्याचा आहे. शेतात उभे पांढरे सोने काळे होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान हा अवकाळी पाऊस आणखी ३ दिवस असाच बरसत राहणार असून आंबा पिकावरही या बदलत्या वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता पुढील दिवसात थंडीचा जोर आणखी वाढेल अशी माहिती स्थानिक हवामान तज्ञ डॉ.अनिल बंड यांनी दिली.

मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेच्या खालच्या थरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने एक नवीन पश्चिमी चक्रवात वायव्य आणि पश्चिम भारताला (पश्चिम किनारपट्टी) बाधित करीतआहे. त्यामुळे हवेच्या वरच्या थरात पश्चिमेकडून तर खालच्या थरात पुर्वेकडुन म्हणजे बंगालच्या उपसागरातुन बाष्प युक्त वारे वाहत आहेत. या वार्यांमुळे अकोला,अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ येथे काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात हलक्या मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि गडगडाटासह तर काही ठिकाणी झडी स्वरूपात पाऊस बरसला. मंगळवारी राजस्थान आणि मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. आज दिवसभर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कपाशी वेचण्याकरता मजूर मिळत नसल्याने वेळेत कपाशी वेचणे ज्या शेतकऱ्यांना शक्य झाले नाही त्यांना व भाजी उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.

आज कुठे-कुठे रीप-रीप, कुठे-कुठे जोरदार
मंगळवारी (ता.२८) अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर सह बहुतेक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची गडगडाट विजांसह तर बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. २९ व ३० नोव्हेंबर रोजी विदर्भात हवामान कोरडे राहील असे प्रा अनिल बंड यांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!