श्रीक्षेत्र रिद्धपुर येथील श्रीगोपीराज संस्थानच्या महंतपदी
पूज्य श्री प्रसन्न शास्त्री कवीश्वर यांची निवड .
१६ जानेवारी २०२५ रोजी होणार महंती प्रतिष्ठा सोहळा .
•मिरर वृत्त
•रिद्धपूर प्रतिनिधी
महानुभाव पंथाची काशी व मराठीचे माहेरघर असलेले श्रीक्षेत्र रिद्धपुर येथे २०० वर्षे जुने पुण्यश्लोक अहिल्याबाई/ हरकुबाई होळकर कालीन प्राचीन श्रीगोपीराज संस्थान व श्रीगोपीराज ग्रंथसंग्रहालय आहे. या संस्थानचा राजघराण्याशी संबंध होता. प्राचीन व वैभवशाली परंपरा या संस्थानला लाभली आहे. या गादीवर अनेक थोर आचार्य प्रतिष्ठीत होऊन गेले आहेत. या संस्थानचे विद्यमान महंत कवीश्वर कुलभूषण आचार्य महंत श्रीगोपीराज बाबा शास्त्री उर्फ श्रीनागराज बाबा यांनी ४९ वर्ष महंतपदी राहून या संस्थानची,पथाची व मराठी साहित्याची सेवा केली. ३३ देशांत जाऊन त्यांनी मराठी साहित्याचा व महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार केला. अ.भा.म.परिषेदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवीले.
आता वार्धक्यामुळे श्रीगोपीराज संस्थानची जबाबदारी सांभाळण्याकरीता त्यांनी विश्वस्त मंडळ व परिवाराच्या संमतीने पुज्यश्री प्रवीणदादा उर्फ प्रसन्न शास्त्री यांची निवड केली आहे. दि. १६ जानेवारी २०२५ रोजी विधीपूर्वक समारंभामध्ये महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात येईल.
पुज्य श्री प्रवीणदादा उर्फ प्रसन्न शास्त्री कवीश्वर हे आचार्य श्रीबाबाबाजींचे शिष्य आहेत.वयाच्या ५ व्या वर्षापासून ते आश्रमात आले. श्रीबाबाजींनी त्यांचा मात्यापित्याप्रमाणे सांभाळ केला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी श्री ब्रह्मविद्या विद्यालय संवत्सर व महानुभाव शिक्षणसंस्था वांबोरी येथे ८ वर्षे राहून महाराष्ट्राधिकरण, साहित्याचार्य गुरुवर्य श्री ऋषीराजजी शास्त्री (मामाजी) यांच्याकडून ब्रह्मविद्या महानुभाव तत्वज्ञानाचा अभ्यास केला. १० एप्रिल २००३ रोजी त्यांनी संन्यास दिक्षा घेतली. २०१९ साली श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत विद्यालयातून शास्त्री पदवी प्राप्त केली.
प्रसन्नशास्त्री हे सुस्वभावी, मनमीळावू कार्यकुशल व्यक्तीमत्व आहे. ते उत्तम कवी, लेखक, प्रवचनकार व उत्कृष्ठ निवेदक आहेत. अनेक सभासाध्यी त्यांनी प्रवचन करून पंथाचा प्रचार व प्रसार केला आहे. श्रीगोपीराज ग्रंथालयाचे ते व्यवस्थापक आहेत.अ.भा.म.परिषेदेचे कार्यलायन सचिव हि होते .अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तीची निवड गुरुवर्य श्रीबाबाजी, विश्वस्त मंडळ व परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
दि.१६ जानेवारी २०२५ रोजी पंथातील प्रमुख आचार्यगण, संत महंत, तपस्विनी, वासनिक आणि श्रीक्षेत्र रिद्धपुर निवासी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ वाजता “महंती प्रतिष्ठा प्रदान” सोहळा संपन्न होणार आहे. १७ जानेवारी रोजी दुपारी १वाजता श्रीगोविंदप्रभू राजमठ मंदीरात श्रीपंचकृष्ण महापूजा अवसर संपन्न होईल तदनंतर महाप्रसादाचे आयोजन संस्थानतर्फे करण्यात आले आहे. असे विश्वस्त सुत्राकडून कळविण्यात आले आहे.