spot_img

नीलेश राणेंचा भाजपला रामरामः जय महाराष्ट्र म्हणत उद्या घेणार शिवसेनेचा धनुष्यबाण हाती, कुडाळ विधानसभा निवडणूक लढवणार

नीलेश राणेंचा भाजपला रामरामः जय महाराष्ट्र म्हणत उद्या घेणार शिवसेनेचा धनुष्यबाण हाती

कुडाळ विधानसभा निवडणूक लढवणार

●मिररवृत्त
●मुंबई

भाजप नेते नीलेश राणे यांनी आज भाजपला रामराम केला.. उद्या ते शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये प्रवेश करणार आहेत, माझा शिवसेनतील प्रवेश निश्चित झाला आहे. हा सर्व विषय नेत्यांनी ठरवलेला आहे, असे पत्रकार परिषद घेत नीलेश राणे यांनी म्हटले आहे.नीलेश राणे म्हणाले की, नारायण राणे यांच्या राजकारणाची सुरवात झालेल्या पक्षात मला काम करण्याची संधी मिळत आहे. केवळ कुडाळमधून निवडणूक जिंकण्यासाठी आपण काम करणार आहोत. कुडाळमधून धनुष्यबाणवर निवडणूक लढवणार असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता जवळपास 20 वर्षांनी राणे कुटुंबातील व्यक्ती पुन्हा धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. 2004 साली नारायण राणे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढले होते.

◆शिंदेंच्या नेतृत्वात काम करायची संधी◆

नीलेश राणे म्हणाले की, भाजपमध्ये मला शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी मला कायम लहान भावासारखी वागणूक दिली, भाजपमध्ये सर्वच नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत, ते कायम राहतील. आज जास्त काही बोलण्यासारखे नाही. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याची जी संधी मिळाली त्याचा आनंद आहे. पक्षांने काही हवा काढली नाही. मी शिस्त आणि प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे.

◆नीलेश राणेंचा दोनदा पराभव◆

नीलेश राणे हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार झाले होते. 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नीलेश राणे हे कुडाळ-मालवणमधून लढण्यास इच्छुक आहेत.

◆2014 ला नारायण राणेंचा पराभव◆

कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांचा मिळून 2008 नंतर कुडाळ विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. त्याआधी मालवण विधानसभा मतदारसंघ होता. 1990 पासून 2014 पर्यंत सतत नारायण राणेच या मतदारसंघातून विजयी झाले. पण 2014 ला चित्र पालटलं. काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीधर नाईक यांचे पुतणे वैभव नाईक जायंट किलर ठरले. त्यांनी नारायण राणे यांचा 10 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. तर 2019 मध्येही नारायण राणेंनी रणजित देसाई यांना बळ दिले पण त्याचा फायदा झाला नाही.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!