सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी
●मिररवृत्त
●अमरावती
शिवाई एज्युकेशनल सोशल अँड मेडिकल ट्रस्ट द्वारा संचालित सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट अमरावती, या महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन घेऊन साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या संचालक डॉ पल्लवी मांडवगडे व प्रमुख वक्त्या म्हणून महाविद्यालयाच्या ग्रंथपाल राखी गचके या होत्या
मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते. म्हणूनच 15 ऑक्टोबर ही त्यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जाते. वाचन ही अशी सिद्धी आहे, की त्यामुळे आपल्याला एका हयातीत अनेक आयुष्ये जगता येतात.
अनुभवविश्व व्यापक होतं. जाणीवा समृद्ध होतात. जीवनाचं आणि भवतालाचं आकलन अधिक सखोल होतं. मनाची अव्याहत मशागत करणारा आणि जीवनानुभवाचं अनवट दर्शन घडवणारा पुस्तकांसारखा दुसरा गुरू नाही. भाषेचा अभिजात गोडवा आणि आशयगर्भ कस याची नीजखूण वाचनामुळेच खोलवर पटत जाते. असे वक्तव्य महाविद्यालयाच्या ग्रंथपाल राखी गचके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
एम.बी.ए भाग एक ची विद्यार्थिनी जया बिजोरे हिने द सीक्रेट या पुस्तकाबद्दल, सुनिधी खाकरे हिने मृत्युंजय या कादंबरी बद्दल, व वसुंधरा निस्ताने या विद्यार्थिनीने युगंधरा या कादंबरी बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
या कार्यक्रमाला प्रा. अक्षय उंबरकर, प्रा. साक्षी देशमुख, अक्षय काळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्मिता सूर्यवंशी संस्थेचे सचिव प्रा. दिनेश सूर्यवंशी व कोषाध्यक्ष अभय सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.