spot_img

विधानसभा निवडणूक-2024 मतदार यादीत आपले नाव आजच तपासा

विधानसभा निवडणूक-2024
मतदार यादीत आपले नाव आजच तपासा
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात सुरु केलेला यावर्षीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा 20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मतदान यादीत नाव तपासणे का गरजेचे आहे?

अनेकदा असं दिसतं की नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात. अशावेळी त्यांचे नाव मतदान यादीत न आढळल्यास ते मताधिकाराला मुकतात.

बऱ्याचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते, तिथेच आपले नाव असेल असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात. मात्र मतदार केंद्रांच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते. या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही असे समजून ते मतदानाला मुकतात.

मतदार ओळखपत्रात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक इ. वैयक्तिक तपशिलात चुका असतील तर, मतदाराला असे ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या वेळीही ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते. त्यामुळेही हे बदल करून घेणे आवश्यक आहे.

या सगळ्यासाठी आपण वेळोवेळी मतदार यादीत आपले नाव तपासले पाहिजे. जेणेकरून मतदार यादीत आपले नाव नसेल तर आपण मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतो, तसेच आपल्या वैयक्तिक तपशिलात- पत्त्यात बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करायची गरज असेल तर त्यासाठीचे अर्जही वेळेत भरू शकतो. यामुळे आपण ऐन मतदानाच्या दिवशी होणारा गोंधळ आणि विलंब टाळू शकतो.

मतदान यादीत नाव कसे तपासावे?
ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक electoralsearch.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि दुसरा Voter Helpline App.
आपल्याला, आपले वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदार ओळखपत्रासोबत जोडलेला युनिक मोबाइल नंबर, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्युआर कोड या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

Voter Helpline App च्या होम पेजवरील Search Your Name In Electoral Roll हा पर्याय निवडला की, वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्युआर कोड आणि मतदार ओळखपत्र क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.

electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाइल क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.

आपण एसएमएसद्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाइलवरून ‘ECI हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही पीडीएफ स्वरुपातील मतदार यादी उपलब्ध असते. आपल्या मतदारसंघातील यादी भागानुसार ही मतदार यादी डाऊनलोड करून आपण त्यात आपले नाव तपासू शकता.

यासोबतच आपण जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तिथे उपलब्ध असलेल्या मतदारयादीच्या प्रतीतही आपण आपले नाव तपासू शकतो. तेव्हा, त्वरित आपले नाव तपासा आणि आपला मताधिकार सुनिश्चित करा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!