spot_img

2 वर्षात 112 ग्रंथालये बंद ! शिक्षण, रोजगाराच्या संधी हिरावल्या, 33 कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या

भयावह अन् विदारक स्थिती !

2 वर्षात 112 ग्रंथालये बंद ! शिक्षण, रोजगाराच्या संधी हिरावल्या, 33 कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या

●मिररवृत्त

●अमरावती

गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील ११२ ग्रंथालये बंद झालीत. त्यामुळे त्यावर आधारित तरुणाईच्या शिक्षण आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या. शिवाय ३३ कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्याही गमवाव्या लागल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार शासनाने पहिल्या टप्प्यात ४५ तर दुसऱ्या टप्प्यात ६७ ग्रंथालये बंद केलीत. ही ग्रंथालये बंद होण्यापूर्वी दररोज त्या ठिकाणी प्रत्येकी ५० ते ६० याप्रमाणे ६ हजारांवर तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होत्या. एवढेच नव्हे तर शंभरावर सामान्य वाचक वृत्तपत्रे,ग्रंथ, पाक्षिके आणि मासिके या माध्यमातून वाचनाची भूक भागवित होते. मात्र ग्रंथालये बंद झाल्याने या सर्व बाबींना आता ब्रेक लागला आहे. बंद झालेली बहुतेक ग्रंथालये ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील आहेत. नगरपंचायती आणि ग्रामपंचायती असलेल्या गावांमध्ये ती होती. परंतु व्यवस्थित चालत नसल्याने शासकीय व्याख्येनुसार ती अकार्यक्षम ठरली. त्यामुळे नियमानुसार ती बंद करण्यात आली, असे ग्रंथालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
ग्रंथालये बंद झाल्याने ३३ कर्मचाऱ्यांना आपले रोजगाराचे साधन गमवावे लागले. ग्रंथालय चालविणाऱ्या संस्थांनी अंशकालीन सेवेकरी म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. त्यासाठी शासनाने ठरवून दिल्यानुसार त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात होते. परंतु आता त्या मानधनापासूनही ते वंचित झाले आहेत. ग्रंथालयांची एकूण संख्या १ हजार ७६३ आहे. त्यापैकी ११२ ग्रंथालये बंद झाल्याने एकूण संख्येच्या सात टक्के ग्रंथालयांना कायमचे टाळे लागले आहेत. या ग्रंथालयांसाठीच्या इमारती ह्या त्या-त्या संस्थेने पुरविलेल्या खोल्या होत्या. ग्रंथालये बंद झाल्याने त्या पुन्हा त्यांच्या ताब्यात गेल्या आहेत. तर शासकीय अनुदानातून त्यांनी तयार केलेली ग्रंथसंपदा ही इतर ग्रंथालयांकडे वर्ग करण्यात आली आहे.

●फर्नीचर, ग्रंथ-पुस्तके खरेदी अशक्य●

शासनाने ग्रंथ चळवळीकडे प्रचंड दुर्लक्ष केले आहे. तब्बल १२ वर्षांपासून अनुदानात कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे वाचकांना हव्या त्या सुविधा देता येत नाहीत. वाचकांना बसण्यासाठी फर्नीचर खरेदी करता येत नाही. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक संगणक तसेच पुस्तकांच्या वाढत्या किंमतींमुळे नवी पुस्तके, ग्रंथही विकत घेता येत नाहीत.

©प्रदीप चौधरी, माजी अध्यक्ष, ग्रंथालय संघ, अमरावती.

●त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेऊ●

सात टक्के ग्रंथालये बंद होणे ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. सध्या स्पर्धा परीक्षार्थीची संख्या वाढते आहे. शिवाय मोबाईल, गॅजेट असे गैरलागू पर्याय पुढे आल्याने वाचन संस्कृती धोक्यात आली आहे. त्यामुळे ग्रंथ चळवळ विकसित होणे आवश्यक आहे. बंद झालेल्या ग्रंथालयांची मंडळी पुढे आल्यास त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही पुढाकार घेऊ –

©दीपिका खांडेकर, अध्यक्ष, अंबादेवी ग्रंथालय, अमरावती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!