वनपाल व वनरक्षकास 40 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले !
वसई पूर्व वनविभागाच्या गोखिवरे रेंज नाका कार्यालयातील प्रकार
पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा यशस्वी सापळा
वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा ;दुकलीला अटक
●आशिष राणे,वसई●
पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वसई तालुक्यातील वनविभागाच्या गोखिवरे रेंजनाका येथील वाघराळ बिट परिमंडळ कार्यालयातील वनपाल व वनरक्षकाला 1 लाख 30 हजार रुपयांच्या लाचे प्रकरणी गुरुवारी रात्री सापळा रचून दोघांना अटक केली आहे.
वनरक्षक पन्नालाल बेलदार (35 ) आणि वनपाल पंकज सनेर (45 ) अशीं या दोघा लाचखोरांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई-अहमदाबाद महामार्गावर समांतर चाळ आहे.
या चाळीतील खोल्यांना महामार्गाच्या विरुध्द बाजूने दरवाजे आहेत. तक्रारदार यांनी या चाळीतील खोल्यांना येण्याजाण्याच्या सोईकरीता महामार्गाच्या दिशेने दरवाजा काढण्याचे काम सुरु केले होते. वनपाल पंकजने त्यांना 16 सप्टेंबर रोजी कार्यालयात बोलावले.
विशेष म्हणजे महामार्गाची बाजू ही वन विभागाची हद्द असून त्या बाजूला दरवाजे काढले असल्याने त्यांना वन कायदयानुसार तात्काळ कारवाई करण्याची धमकी दिली.
त्यावेळी तक्रारदाराने कारवाई न करण्याची विनंती केली. त्यानंतर वनपाल पंकज व वनरक्षक पन्नालाल या दोघांनी प्रत्येक खोलीमागे 80 हजार रुपये अशी 3 खोल्यांसाठी लाचेची मागणी केली.
एकंदरीत तक्रारदाराने कारवाई टाळण्यासाठी नाईलाजास्तव मागणी केलेल्या रकमेचा पहिला हप्ता 90 हजार रुपये दि 16 सप्टेंबर रोजी दिले. मात्र उर्वरित पैश्यासाठी आरोपींनी तगादा केल्यावर दि 25 सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली होती.
त्यानंतरही पैश्यासाठी तगादा केल्यावर तक्रारदाराने वैतागून गुरुवारी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.
परिणामी लाचलुचपत विभागाने तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पडताळणीत या दोघांनी 90 हजार रुपये स्विकारले असून उर्वरित रक्कम तडजोडीअंती 1 लाख 30 हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पथकाने लागलीच गोखिवरेच्या रेंज नाका येथील वनविभागाच्या कार्यालयात लावलेल्या सापळा पंचनाम्याच्या दरम्यान वनरक्षक पन्नालाल याला 40 हजार रुपये स्विकारताना जागेवरच रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर वनपाल पंकज सनेर यालाही अटक करण्यात आली