जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था,शेवतीवासीयांनी अडविले ट्रक
●ग्रामपंचायत आकारते शंभर रुपये खासगी टोल नाका
●संतप्त ग्रामवासीयांची रस्ता दुरुस्तीची मागणी
●मिररवृत्त
●मंगेश तायडे/नांदगाव पेठ
राख,गिट्टी, मुरूमाच्या ओव्हरलोड आणि बेकायदेशीर वाहतुकीमुळे शेवती येथील मुख्य रस्त्याची दूरावस्था झाली आहे.अनेकदा तक्रारी देऊनही ग्रामपंचायतने रस्त्याची दुरुस्ती न केल्याने शनिवारी सकाळी संतप्त शेवतीवासीयांनी सर्व ट्रक थांबवून रास्ता रोको आंदोलन केले.गावकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या धोरणाचा निषेध करत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत येथून एकही मोठे वाहन जाणार नाही अशी भूमिका घेतली.
शेवती जहागीर गावाच्या आजूबाजूला स्टोन क्रशर तसेच अनेक खदानी असून येथून गिट्टी व मुरुमाचे उत्खनन करून क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यात येत आहे.या जड वाहतुकीमुळे जळका शहापूर, शेवती जहागीर ते मासोद या मार्गाची अक्षरशः दुरावस्था झालेली असून या रस्त्यावरून पायदळ चालणे अशक्य झाले आहे.अनेक दुचाकी घसरून याठिकाणी अपघात झालेले आहेत तर शाळेच्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात ये जा करणे देखील कठीण होत आहे. अश्या परिस्थितीत काही नागरिक ग्रामपंचायत मध्ये निवेदन घेऊन गेले तर महिला सरपंच चक्क युवकांच्या अंगावर गेल्या. आणि कुणाकडून काय होते ते करून घ्या रस्ता बनणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली.
या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो वाहनांकडून प्रत्येकी शंभर रुपये खासगी टोल ग्रामपंचायत आकारत असून आतापर्यंत ग्रामपंचायतकडे दहा लक्ष रुपये जमा असल्याचा आरोप गजानन लुंगे यांनी केला असून त्याच पैशातून आम्हाला रस्ता बनवून द्यावा अशी मागणी यावेळी लुंगे यांनी केली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसून जोपर्यंत आम्हाला रस्ता दुरुस्त करून देत नाही तोपर्यंत एकही ट्रक या मार्गावरून जाऊ देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलेला आहे.यावेळी या रस्ता रोको आंदोलनात शेवती जहागीर येथील नागरिक, विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.