spot_img

कनिष्ठ अभियंता लेकीने केल्या कुटुंबियांच्या आशा ‘पल्लवी’त,सरळ सेवा भरती मधून गोंदिया येथे कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती, आ. यशोमती ठाकूर यांनी केला सन्मान

कनिष्ठ अभियंता लेकीने केल्या कुटुंबियांच्या आशा ‘पल्लवी’त

●सरळ सेवा भरती मधून गोंदिया येथे कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती

●आ. यशोमती ठाकूर यांनी केला सन्मान

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

प्रतिकूल परिस्थिती, आईवडील निरक्षर, कुटुंबात शिक्षणाचा गंधही नाही मात्र अश्या विपरीत परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून अमरावती तालुक्यातील खानापूर येथील लेकीने ज्ञानज्योत लावून आपल्या कुटुंबियांच्या आशा पल्लवित केल्या. सरळ सेवा भरती मधून नुकतीच पल्लवी गोवर्धन आमझरे या युवतीची गोंदिया येथे कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती झाली. सर्वसामान्य कुटुंबातील युवतीने मिळविलेल्या या यशाबद्दल आ. यशोमती ठाकूर यांनी पल्लवीच्या घरी जाऊन तिचा आईवडिलांसह यथोचित सन्मान केला.
पल्लवी गोवर्धन आमझरे ही खानापूर येथील रहिवासी असून ती सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य आहे. कुटुंबात कुणालाही शिक्षणाचा गंध नाही, मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आमझरे कुटुंबीयांनी मात्र आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी आपल्या परीने प्रयत्न केला.गरिबीची झळ सोसलेल्या पल्लविने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जाणून घेतले होते. त्यामुळे परिस्थिती विपरीत जरी असली तरी आपला आत्मविश्वास कायम ठेवत शिक्षण पूर्ण केले आणि नुकत्याच सरळ सेवा भरती अंतर्गत झालेल्या कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली.
पल्लवीला गोंदिया जिल्हा परिषद मधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती मिळाली असुन लवकरच ती रुजू होणार आहे.पल्लवीच्या यशाची माहिती मिळताच आ. यशोमती ठाकूर यांनी पल्लवी आमझरे हीचा तिच्या आईसह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपुर्ण सत्कार केला. आ. यशोमती ठाकूर यांनी पल्लवीचे कौतुक करत तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पल्लवी च्या आईने पल्लवी चा सांभाळ करीत तिला शिक्षण दिले आणि स्पर्धा परीक्षा योग्य परिश्रम घेण्यासाठी बळ दिले. ग्रामीण भागातील तरुण-तरुणी आता सरकारी सेवेत दाखल होण्यासाठी अतिशय परिश्रम घेऊन अभ्यास करतात आणि यशाला गवसणी घालतात हे चित्र खूप आशादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळी ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातून संघर्ष करून शासकीय सेवेत येणारे तरुण-तरुणी निश्चितच प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतील आणि राज्याला प्रगतीपथावर नेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच बिकट परिस्थितीत पल्लवीला शिक्षणासाठी प्रोत्साहित करणाऱ्या पालकांचे सुद्धा यावेळी आ. ठाकूर यांनी अभिनंदन केले. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऍड. अमित गावंडे तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!