दखल:अखेर कृषि विभागाचे अधिकारी पोहचले बांधावर
नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी,पाणी व औषधीचे घेतले नमुने
करपलेले पिकं पुनर्जीवित करण्यासाठी दिल्या टिप्स
●मंगेश तायडे
●नांदगाव पेठ
येथील शेतकऱ्याने १५ एकर शेतातील सोयाबीनवर फवारणी केल्यानंतर त्यांच्या शेतातील उभे पिकं अक्षरशः करपले होते.गुरुवारी हा प्रकार झाल्यानंतर शेतकरी शरद एकनाथराव भुस्कडे यांनी कृषि अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली मात्र अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केल्यानंतर शेतकऱ्यासोबत घडलेला प्रकार रविवारी वृत्तपत्रात प्रकाशित होताच सोमवारी सकाळी ९ वाजताच कृषि विभागाचे सर्व अधिकारी थेट बांधावर पोहचले.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ.मुंजे,उपविभागीय कृषि अधिकारी पंकज चेडे, तालुका कृषि अधिकारी सागर ठाकरे,पंचायत समिती अमरावतीचे कृषि अधिकारी बहेकर,कृषि पर्यवेक्षक नितीन व्यवहारे,नांदगाव पेठ येथील कृषि सहाय्यक अनिकेत पुंड यांनी नुकसानग्रस्त शेतकरी शरद भुस्कडे यांच्या शेतात भेट देऊन त्यांनी पंचनामा केला तसेच पाण्याचे व औषधीचे नमुने घेऊन याबाबत लवकरच अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याशिवाय सोयाबीन पिकावर २ टक्के युरियाची फवारणी करण्याच्या सूचना उपविभागीय कृषि अधिकारी पंकज चेडे यांनी सदर शेतकऱ्याला दिल्या.आठ दिवसांमध्ये पिकांवर त्याचा काय प्रभाव होतो हे पुन्हा येऊन बघितल्या जाईल असेही ते म्हणाले.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ. मुंजे यांनी सुद्धा पिकाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून पुढील दक्षता बाबत शेतकऱ्यांना सूचना दिल्या.याप्रकरणी योग्य चौकशी करण्यात येईल असेही पंकज चेडे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
◆पिकांवर अतिरिक्त औषधांचा मारा करू नये- चेडे◆
सोयाबीन सारख्या पिकांवर अतिरिक्त औषधांचा मारा करू नये.सोयाबीन पिकाला मोजकेच आणि अत्यंत कमी रकमेच्या औषधांची गरज असते. त्यामुळे दोन तीन औषधांचे मिश्रण करून पिकांवर फवारणी करू नये.त्यामुळे पिके खराब होण्याची शक्यता असून याबाबत काही मार्गदर्शन लागल्यास कृषि विभाग शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करेल असा संदेश उपविभागीय कृषि अधिकारी पंकज चेडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
‘कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात भेट देऊन पिके बघितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा युरिया फवारणी करतो मात्र तरीपण पिके पुनर्जीवित झाली नाही तर आमची झालेली नुकसानभरपाई कृषि अधिकारी किंवा संबंधित कंपनीने भरून द्यावी अशी मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी शरद भुस्कडे यांनी केली.’