spot_img

सकाळी केली फवारणी,दुपारी पंधरा एकरातले पीक करपले, नांदगाव पेठ येथील शेतकऱ्याला बसला निकृष्ट औषधीचा फटका,तालुका कृषि अधिकाऱ्याचे औषधी कंपनीला सरंक्षण

सकाळी केली फवारणी,दुपारी पंधरा एकरातले पीक करपले

●नांदगाव पेठ येथील शेतकऱ्याला बसला निकृष्ट औषधीचा फटका
●तालुका कृषि अधिकाऱ्याचे औषधी कंपनीला सरंक्षण

◆मिररवृत्त
◆मंगेश तायडे
◆नांदगाव पेठ

पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग आधीच संकटात सापडला असून निकृष्ट बी बियाणे आणि औषधींमुळे देखील शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अश्यातच नांदगाव पेठ येथील एका शेतकऱ्याने निकृष्ट औषधी फवारल्याने चक्क पंधरा एकर शेतीमधील पिके करपल्याचा प्रकार गुरुवारी घडला.सकाळी ११ वाजता फवारणी केली आणि दुपारी दोन वाजता संपूर्ण शेतातमधील पिके करपून गेल्याने संताप निर्माण होतो आहे.पंधरा एकरातील पिके करपल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शरद एकनाथराव भुस्कडे यांची नांदगाव पेठ शेत शिवारात पंधरा एकर सामायिक शेती असून त्यांनी शेतामध्ये सोयाबीन पेरणी केली होती.पिके वीस दिवसांची झाल्यावर गुरुवारी भुस्कडे यांनी सुपर प्रोफेक्स, यूपीएल साप पावडर १९-१९-१९ आदींचे नियोजित मिश्रण करून सकाळी ११ वाजतापासून संपूर्ण शेतात फवारणी केली.अतिशय चांगल्या दर्जाचे पीक उभे असतांना दुपारी २ च्या सुमारास संपूर्ण शेतातील पीक करपून गेल्याने शेतकऱ्याला चांगलाच झटका मिळाला.
शेतकऱ्याने तातडीने कृषि अधिकारी, संबंधित कंपनीचे अधिकारी आणि विक्रेता यांना याबाबत माहिती दिली. कृषि अधिकाऱ्याने नेहमीप्रमाणे उंटावरून शेळ्या हाकत फोनवरच सांगितले की, तुम्ही फवारणी यंत्रातून आधी तणनाशक मारले असेल त्याच फवारणी यंत्रांचा आता वापर केला त्यामुळे तुमची पिके जळाली. संबंधित कंपनी चांगली आहे, त्यांचे उत्पादन चांगले आहे त्यांच्या औषधीमुळे पिके करपूच शकत नाही असा जावईशोध तालुका कृषि अधिकारी बायस्कर यांनी लावत शेतकऱ्याला कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही असे पंचनामा न करताच सांगितले. शेतकऱ्यांने अधिकाऱ्यांना शेतात येण्याची विनंती केली मात्र गुरुवारी फोन करूनही अधिकारी पंचनाम्यासाठी शेतात पोहचले नाहीत.
संबंधित कंपनीचे अधिकारी शुक्रवारी शेतात पोहचले त्यांनी त्यावर ग्लुकोज मारण्याचा सल्ला दिला.शेतकऱ्याने ग्लुकोज देखील मारले मात्र पिके पूर्ववत झाली नाही. शनिवारी संपूर्ण पिके खाक झाली होती.पंधरा एकरातील पीक सहज नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला मात्र कृषि अधिकाऱ्यांनी उंटावरून शेळ्या हाकलण्याऐवजी थेट बांधावर जाण्याची देखील तसदी घेतली नाही. कृषी अधिकारी आणि संबधीत कंपनीचे साटेलोटे असल्याने अधिकाऱ्यांनी शेतात जाण्याचे टाळले असा शेतकऱ्यांचा आरोप असून याप्रकरणी नुकसानभरपाई न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्याने दिला आहे.

●अधिकाऱ्यांची अनास्था●

शेतकऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करणारे कृषि विभाग केवळ जागेवर बसून कागदी घोडे नाचवत असतात. शेतकरी वर्ग संकटात असतांना त्यांना मदत करणे तर सोडाच मात्र त्यांचे आणखी खच्चीकरण कसे होईल याच प्रयत्नात अधिकारी व कर्मचारी असतात. तालुका किंवा जिल्हा कृषि अधिकारी दौऱ्याच्या नावाने मोठमोठी बिले काढतात प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर हे कधीच पोहचत नसतात ही शोकांतिका आहे.सततची नापिकी दुष्काळ आणि निकृष्ट औषधामुळे होणारे नुकसान हे शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा फटका देऊन जातात मात्र देशाचा पोशिंदा शेतकरी राजा हा केवळ नावापुरताच असून खरे राजे हे अधिकारी झाले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!