spot_img

नवनीत राणा यांच्या उमेदवारीविरोधात भाजप आक्रमक, स्थानिक नेत्यांचे फडणवीस व बावनकुळे यांना साकडे

नवनीत राणा यांच्या उमेदवारीविरोधात भाजप आक्रमक
स्थानिक नेत्यांचे फडणवीस व बावनकुळे यांना साकडे

◆मिररवृत्त
◆अमरावती

२६ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अमरावतीच्या भाजप सदस्यांनी आज केली. यासंदर्भात भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे स्थानिक नेत्यांनी साकडे घातल्याबाबत विश्वसनीय वृत्त आहे.यातून अमरावतीच्या भाजप नेत्यांनी एकप्रकारे नवनीत राणा यांच्या उमेदवारीविरोधात रान उठवले आहे हे स्पष्ट दिसत आहे.
महायुतीअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेकची जागा शिंदे गट शिवसेनेला देण्याचे आणि अमरावतीची जागा भाजपकडे ठेवण्याबाबत बोलले होते, तेव्हापासून कदाचित यावेळी भाजप अमरावती जिंकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, त्यासाठी राणा दाम्पत्याने तयारीही सुरू केली होती, मात्र आता उमेदवारी प्रक्रिया सुरू होण्यास अवघे दोनच दिवस शिल्लक असताना अचानक भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गटाने आज नागपुरात फडणवीस यांची भेट घेतली असता, काहीही झाले तरी भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार करू नये अशी मागणी घेऊन अमरावती येथील भाजपच्या १५ सदस्यीय गटाने नागपूर येथे जाऊन फडणवीस यांची भेट घेतली व त्यांनतर कोराडी येथे जाऊन बावनकुळे यांची भेट घेऊन नवनीत राणा विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. स्थानिक भाजप सदस्यांमध्ये आमदार प्रवीण पोटे यांच्यासह तुषार भारतीय, दिनेश सूर्यवंशी, चेतन गावंडे, किरण पातुरकर, किरण महल्ले, जयंत डेहनकर, निवेदिता चौधरी, सतीश करेसिया, लखन राज, विवेक कलोती, रवींद्र खांडेकर आणि चेतन पवार आदींचा समावेश होता.
या बैठकीत फडणवीस यांनी या नेत्यांना काय आश्वासन दिले, हे कळू शकलेले नाही. फडणवीस जिल्हा भाजपची ही मागणी आणि निवेदन वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवतील, असा अंदाज बांधता येतो. गेल्या काही वर्षात बदललेल्या भाजपमध्ये ही पहिलीच वेळ आहे, की जिल्हा भाजपने एकजूट दाखवून वरिष्ठांपर्यंत कोणाची तरी तक्रार केली, तीही आपल्या पक्षाचा सामान्य सदस्य नसलेल्या नेत्याच्या विरोधात त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत भाजपमधून नकारघंटा येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

◆कार्यकर्त्यांनाही हवा भाजपचाच उमेदवार◆

कित्येक वर्षानंतर अमरावती लोकसभा मतदार संघ कमळ साठी सुटला असून आता भाजपचाच उमेदवार हवा अशी इच्छा शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांची आहे. नवनीत राणा कमळ वर निवडून आल्या तर त्या भाजप कार्यकर्त्यांना सन्मान देणार नाही अशी भीती सुद्धा कार्यकर्त्यांना आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!