spot_img

पांढरीच्या ग्रामस्थांचा आयुक्तालयावर मुक्काम; तोडगा न निघाल्यास मंत्रालयाच्या दिशेने वळणार,प्रशासनाने मागितला 3 दिवसांचा वेळ

पांढरीच्या ग्रामस्थांचा आयुक्तालयावर मुक्काम; तोडगा न निघाल्यास मंत्रालयाच्या दिशेने वळणार,प्रशासनाने मागितला 3 दिवसांचा वेळ

◆मिररवृत्त
◆अमरावती

‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार’ अशा नावाचे कमान गेट लावण्याच्या मुद्द्यावरुन समोरा समोर आलेल्या पांढरी (खानमपुर) येथील दोन गटांपैकी एका गटाने आज, गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयावर धडक दिली. दरम्यान मुद्दा निकाली काढण्यासाठी प्रशासनाने तीन दिवसांचा अवधी मागितला असून तोपर्यंत आम्ही जागचे हलणार नाही, या संकल्पावर आंदोलनकर्ते ठाम आहेत. त्यामुळे प्रशासनापुढे अजब पेच निर्माण झाला असून उशीरा रात्रीपर्यंत हीच स्थिती कायम होती.
प्रवेशद्वारासाठीचे सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आल्याने आम्हाला त्वरेने बांधकामाची परवानगी द्या आणि याच मुद्द्यावरुन अॅट्रासिटी दाखल झालेल्या व्यक्तींना त्वरेने अटक करा, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीला अनुसरुन आंदोलनकर्त्यांच्या एका प्रतिनिधीमंडळाने दुपारी विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा झाली. परंतु तोडगा मात्र निघाला नाही. दरम्यान प्रशासनाला तीन दिवसांचा अवधी द्या आणि आंदोलन तूर्त मागे घ्या, असा आयुक्तांचा प्रस्ताव संबंधितांनी धुडकावून लावला आहे.
तोडगा निघेपर्यंत आम्ही येथेच ठाण मांडून बसतो, अशी भूमिका त्यांनी घेतली असून त्यानंतर मंत्रालयाकडे मार्च करण्याचा निर्धार केला आहे. प्रतिनिधीमंडळात ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा इंगोले व इतर स्थानिक प्रतिनिधींशिवाय आचार्य कमलताई गवई, बौध्द महासभेचे पदाधिकारी विजय चोरपगार, माजी नगरसेवक सुदाम बोरकर आदींचा समावेश आहे. या सर्वांनी आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून सर्व बाबी स्पष्ट असल्यामुळे प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारु नये, त्वरेने तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपुरच्या मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार बांधून त्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव देण्याचा ठराव सन २०२० ला ग्रामपंचायतीने संमत केला. परंतु, काही कारणास्तव त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर पुन्हा २६ जानेवारी २०२४ रोजी नव्याने ठराव घेण्यात आला. त्यानुसार ३१ जानेवारी २०२४ ला गावकऱ्यांनी तात्पुरते लोखंडी प्रवेशद्वार उभारून त्यावर बॅनर लावले. तेव्हापासून गावातील दोन गटात वादाची ठिणगी पडली. पुढे १३ फेब्रुवारीला प्रवेशद्वार काढण्यावरून झालेल्या वादाने दोन्ही गटाच्या नागरिकांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडून आंदोलन सुरु केले. त्यातीलच एका गटाने बुधवारी गाव सोडण्याचा निर्णय घेत मंत्रालयाकडे मार्च सुरु केला. हाच मार्च आज, गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!