spot_img

युती केली तर वाचाल नाहीतर जेलमध्ये जाल ;प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस – राकॉला इशारा ,वंचित बहुजन आघाडीची लोकशाही गौरव सभा

युती केली तर वाचाल नाहीतर जेलमध्ये जाल

◆प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस – राकॉला इशारा

◆वंचित बहुजन आघाडीची लोकशाही गौरव सभा

◆सभेसाठी जिल्हाभरातून उसळला लाखोंचा जनसागर

◆मिररवृत्त
◆अमरावती
मोदी – शाह तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर सोनिया गांधीपासून सगळेच जेलमध्ये जातील. जेलमध्ये जाणाऱ्यांमध्ये वंचित आघाडीचा एकही नसेल. दोन – पाच जागा कमी मिळाल्या म्हणून तर काहीही फरक पडत नाही. उलट आघाडी मजबुत होईल् आणि वंचित समुदायाचा पाठिंबा मिळून आपण सत्तेत येऊ शकतो. त्यामुळे आमच्याशी युती केली तर वाचाल नाहीतर जेलमध्ये जाल असा ठणठणीत इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.
स्थानिक सायंस्कोअर मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित लोकशाही गौरव महासभेदरम्यान जनसुमदायाला संबोधित करताना अॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी सभेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा, उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, निशा शेंडे, राजेंद्र पातोडे, भारती गुडधे, सिद्धार्थ भोजने, सुरेश तायडे, निलेश वाकोडे, शैलेष गवई, अशोक मोहोड, अभिजित देशमुख, अंकुश वाकपांजर, नंदू वानखडे, पुंडलिकराव वाठ आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्ष टिकले मात्र एवढ्या दिवसात त्यांना कधीही लोकसभेच्या साध्या ४८ जागांचे सुध्दा वाटप करता आलेले नाही. यांना नक्की लढायचे आहे की नाही हेच कळत नाही. यांना युती नको म्हणून बळीचा बकरा हवा आहे. आणि वंचित आघाडी म्हणजे बळीचा बकरा नव्हे अशा ठणठणीत शब्दात अॅड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
देशातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लुट सुरू आहे. आता सोयाबीन, कापसाला भाव मिळत नाही. आधी पणन महासंघ असताना दरवर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० रूपयांचे अनुदान मिळत होते. परंतू आता काहीही मिळत नाही. शेतकऱ्यांना देण्याची दानत या सरकारमध्ये उरलेली नसून हे केवळ लुटारूंचे सरकार आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केला. आम्ही पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे धोरण लागू करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
अमरावती जिल्ह्यापेक्षाही लहान असलेला मालदीव देश आज मोदीला न घाबरता थेट सैन्य परत घेऊन जाण्याचा इशारा देतो आहे. मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींचा काळात जी बदनामी झाली ती आजवर कधीही झालेली नाही. मोदी डमरू वाजवतात आणि सगळे नाचायला लागतात असा मदारीचा खेळ देशात सुरू आहे. देशातील सनातनी विचारांच्या लोकांना देखील माझा प्रश्न आहे की, देशाची अब्रू आणखी किती घालवायची आहे याचाही त्यांनी विचार करावा. जे जेलमध्ये गेले भाजप त्यांनाच घाबरते जे भितीपोटी काहीच बोलत नाही त्यांना मोदी घाबरत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी कणखर होणे गरजेचे असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. देशात जी व्यवस्था आज आहे ती टिकवायची असेल तर आपल्याला परिवर्तन घडविणे गरजेचे आहे. जिंकण्याच राजकारण वंचित आघाडीला करायचे असून यापुढे सत्ता आपल्याला हातात घ्यायची आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा विजय करण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन साथ द्यावी असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केले.
या सभेला जिल्हाभरातून आलेले लाखो नागरिक, वंचित आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

◆राज्यात कुणीही कंत्राटी कर्मचारी नसेल – डॉ. निलेश विश्वकर्मा◆

खासगीकरणाचा महापूर आणणाऱ्या या सरकारने सर्वच ठिकाणी आता कंत्राटीकरण सुरू केले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा करोडो रूपयांचे घोटाळे बाहेर येत आहेत. विरोधक या विषयावर गप्प असताना केवळ वंचित बहुजन आघाडीनेच हा विषय ऐरणीवर आणून सरकारविरोधात आवाज उचलला आहे. यापुढे कोणत्याही स्पर्धा परीक्षेची फी ५०० रूपयांपेक्षा जास्त नसेल असा निर्णय आमचा आहे. ज्यांचे वय झाले असे लोक राजकारणात तरूणांना येऊ देत नाही याउलट बाळासाहेब आंबेडकर हे तरूणांच्या हाती राजकारण देऊ इच्छितात. असा द्रष्टा नेता लाभणे हे आपले सुदैव आहे. अमरावती जिल्हयात एकीकडे खोटे प्रमाणपत्रावर झालेली खासदार असून दुसरीकडे बॅग उचलणाऱ्याला खासदार करण्याच्या तयारीत काही मंडळी आहेत. त्यामुळे आता अमरावतीला योग्य निर्णय घेऊन वंचित आघाडीच्या योग्य उमेदवाराला निवडून द्यायचे आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा यांनी आपल्या भाषणातून केले.

●देशात अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा कट●

देशातील संविधानाशी छेडछाड करण्याचा आणि हुकुमशाही आणण्याचा एककलमी कार्यक्रम देशात मोदी – शहा राबवत आहेत. इतर सर्व पक्ष संपवून केवळ एकाच पक्षाच्या हाती देशाचे राजकारण द्यायचे आहे. भारतातील संसदीय लोकशाही संपवून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा कट आज रचला जात असून त्यापासून आपल्या सर्वांना सावध व्हावे लागेल. मराठा, तेली, माळी, कुणबी, धनगर किंवा वंचित समुदायातील कुणीही या अध्यक्षीय लोकशाहीत निवडून येऊ शकणार नाही. तुम्हाला कायमचे गुलाम बनविण्यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे. आरक्षण जीवंत असल्यानेच बहुजन समाज सत्तेत असून आरक्षण संपले की सर्व काही संपेल असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

●मराठा समाजाने सावध होणे गरजेचे●

राज्यात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज आज गरिब मराठ्यांच्या अस्तित्वासाठी लढतो आहे. भाजप – काँग्रेसची इच्छाशक्ती असती तर मराठ्यांना केव्हाच आरक्षण मिळाले असते. जातीच्या मागे जर आपण पुन्हा लागलो तर पुन्हा एकदा समाज अंधारातच राहील व आज जेवढे शिल्लक आहे ते संपून भुमिहिन व्हाल. इथे सगळेच एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांना नातेवाईकांचेच राजकारण हवे आहे. गरिब मराठ्यांचा तर इथे प्रश्नच उरलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाने सावध होणे आवश्यक असल्याचे मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!