पक्ष सोडणारे चोर किंवा डरपोक
●ॲड. यशोमती ठाकूर यांचा अमरावतीत घणाघात
●मिररवृत्त
●अमरावती
काही लोक काँग्रेस पक्षातील वैभवशाली परंपरा सोडून आता दुसऱ्या पक्षाचा मार्ग अवलंबत आहेत. मात्र हे लोक एकतर डरपोक आहे किंवा चोर अशा तिखट शब्दात माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी घनाघात केला. अमरावती येथे भरलेल्या काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे न्याय मिळेपर्यंत आपल्याला प्रत्येक घराघरात गेलं पाहिजे. प्रत्येक घराघरात सर्वधर्मसमभावाचा दिवा लावला पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात तिरंगा फडकवला पाहिजे. आज काही लोक हे केवळ विष पेरण्याचं काम करीत आहेत मात्र समाजात त्यांनी पेरलेलं विष कमी करण्याचे काम आपलं आहे. त्यांना जितकं विष पेरायचा आहे पेरू द्या मात्र आपल्याला घराघरात प्रेमच द्यायचा आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने आम्हाला असा कार्यक्रम द्यावा ज्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाप्रती सर्वधर्मसमभावाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हायला पाहिजे. असे ॲड. ठाकूर म्हणाल्या.
पक्षातील एक माजी केंद्रीय राज्यमंत्री नुकतेच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत मात्र व्यक्ती तेव्हाच पक्ष सोडून जाते जेव्हा एक तर ती खूप डरपोक असते किंवा तिच्या मनात चोर असतो. अन्यथा सर्वधर्मसमभाव मांडणाऱ्या पक्षातून कोणीही जाणार नाही. आम्ही सर्व कार्यकर्ते ही ग्वाही देतो की, आम्ही कधीही पक्ष सोडून जाणार नाही, असे त्यांनी यावेळी ठामपणे निक्षून सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जर वातावरण पाहत असाल तर अमरावतीमध्ये पक्षासाठी अतिशय चांगले वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हेच वातावरण यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या ठिकाणी सुद्धा आहे. जर आपण सर्व एकसंघपणे एकत्र आलो आणि एक दिलाने काम केलं तर निश्चितच अकोल्यामध्ये सुद्धा हेच वातावरण दिसायला हरकत नाही, असा ठाम विश्वास यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.