स्नेहसंमेलनामधून आव्हाने झेलणारी पिढी निर्माण होते
■पत्रकार मंगेश तायडे यांचे प्रतिपादन
■माध्यमिक कन्या शाळेत वार्षिक स्नेहसमेलन
■मिररवृत्त
■नांदगाव पेठ
पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, आजकालचे विद्यार्थी आधुनिक संसाधनांमुळे एकटी पडत आहे मैदानी खेळ सुद्धा कमी खेळत आहे त्यामुळे शाळांमधून होणारी स्नेहसंमेलने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना समोर आणण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे,याच स्नेहसंमेलनामध्ये मोठमोठी आव्हाने झेलणारी पिढी निर्माण करण्याचे सामर्थ्य असून भारताचे भविष्य समजली जाणारी आजची पिढी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन पत्रकार मंगेश तायडे यांनी माध्यमिक कन्या विद्यालय येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात केले. ते सत्कारमूर्ती म्हणून आपले मनोगत व्यक्त करत होते.
माध्यमिक कन्या शाळेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात विविध क्षेत्रांतील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पत्रकारिता क्षेत्रातील राष्ट्रीय स्तराचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल पत्रकार मंगेश तायडे, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा.गणेश पोकळे तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सप्तरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तुळे,सुवर्णकण्या तथा विद्यालयाची माजी विद्यार्थिनी वैष्णवी मुळे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला विचारपिठावर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुनीता बाळापुरे या लाभल्या होत्या तर उदघाटक म्हणून डॉ. नयना दापुलकर ,मुख्याध्यापिका नलिनी ढानके,सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पा तिखे यांची उपस्थिती होती.
सर्व सत्कारमूर्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती प्रा. गणेश पोकळे, राजेंद्र तुळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान माध्यमिक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्य, स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका ज्योती सोळंके, नितीन चौधरी, मयुरी बानासुरे,समीक्षा कापडे, वैष्णवी गोलाईत,कैलाश सोनोने यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अलका मेश्राम यांनी केले तर आभार सोनाली वानखडे यांनी मानले.