spot_img

भाऊसाहेब देशमुखांनी 2 कोटी लोकांना वाटल्या होत्या जमीनी: व्याख्यानादरम्यान शेतकरी नेते प्रशांत गावंडे यांनी उघड केल्या आठवणी

भाऊसाहेब देशमुखांनी 2 कोटी लोकांना वाटल्या होत्या जमीनी: व्याख्यानादरम्यान शेतकरी नेते प्रशांत गावंडे यांनी उघड केल्या आठवणी

■मिररवृत्त
■अमरावती

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशातील 73 टक्के जमीन ही त्या काळच्या जमीनदारांकडे होती.पंडित नेहरूंनी हा प्रश्न भाऊसाहेबांकडे सोपविला आणि पुनर्वितरण कायदा लागू करून भाऊसाहेबांनी दोन कोटी लोकांना जमिनी वाटल्या,असे प्रतिपादन प्रसिद्ध शेतकरी नेते तथा अकोला येथील शेतकरी जागर मंचचे प्रमुख प्रशांत गावंडे यांनी केले.श्री.शिवाजी शिक्षण संस्था आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख व्याख्यानमालेत ते बोलत होते.
मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात आयोजित या व्याख्यानाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी भूषविले.तर संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले,सचिव डॉ.वि.गो.ठाकरे,स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ.अमोल महल्ले,नरेशचंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.गावंडे पुढे म्हणाले,भारताच्या घटना समितीत शेतीच्या अर्थशास्त्रावर पहिल्यांदा कोणी चर्चा घडवून आणली असेल तर ती डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी.मात्र एवढ्या मोठ्या लोकहितकारी कार्याचा उल्लेख घटना समितीच्या बैठकीशिवाय कुठेही सापडत नाही.पण हे भाऊसाहेबांचे सर्वात महान कार्य होते.भाऊसाहेब हे बुद्धीप्रामाण्यवादाचे पुरस्कारक होते.
‘डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी विषयक विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर बोलताना गावंडे म्हणाले, भाऊसाहेब देशमुख यांनी या देशात हरितक्रांती सुरु केली आणि पुढे शरद पवार यांनी हरितक्रांती आणली. भाऊसाहेबांचा वारसा त्यांनी पुढे चालविला. भाऊंचा खरा वारसा महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकर यांचा होता तर डॉ.आंबेडकर यांच्या ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथाची मुख्य प्रेरणा भाऊसाहेब होते.आज देशातील तूर, कापूस, सोयाबीन, कांदा, गहू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था आणि त्याला कारणीभूत असलेली सरकारची धोरणे यावर विस्तृत भाष्य करताना गावंडे म्हणाले की, आज पर्यंत साडेचार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या;आत्महत्या नसून त्या व्यवस्थेने घडवून आणलेल्या हत्या आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण भाऊसाहेबांचे बौद्धिक प्रतिनिधी म्हणून पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.व्याख्यानमालेचे प्रास्ताविक व स्वागतपर श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. कुलदीप मोहाडीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मनोज जोशी यांनी तर आभार प्रा. सीमा मेटकर यांनी मानले. या वेळी प्रशांत गावंडे यांचा शाल, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. व्याख्यानाला संस्थेचे आजीव सदस्य, विविध शाळा- महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, विचारवंत, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!