कापसावरील कट्टी बंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांकडून सभापती, उपसभापती यांचा सत्कार
■निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणार लाभ
नितीन हटवार यांनी केली होती पहिल्यांदा मागणी
■मिररवृत्त
■नांदगाव पेठ
कृषी उत्पन्न बाजार समिती मधील संचालक मंडळाने घेतलेल्या कापसावरील अर्धा किलो कट्टी बंदीच्या निर्णयाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सभापती आणि उपसभापती यांचा सत्कार केला. संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबणार असून याचा शेतकऱ्यांचा लाभ होईल.माजी जि.प.सदस्य नितीन हटवार यांनी मागील वर्षी पहिल्यांदा कट्टी बंदीची मागणी केली होती हे विशेष!
शेतकरी वर्ग उत्पादन केलेला कापूस कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आणतो तेव्हा व्यापारी वर्ग प्रति एक क्विंटल कापसामागे अर्धा किलो कापूस कट्टी म्हणून घेतो.कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी सात लक्ष क्विंटल पेक्षा अधिक कापूस खरेदी करण्यात येतो त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा असलेला कापूस कट्टी म्हणून देणे अन्यायकारक असल्याचे नितीन हटवार यांनी म्हटले होते. मागील संचालक मंडळाला त्यांनी निवेदन देऊन कट्टी बंदीची मागणी केली होती.
कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही कट्टी बंद करण्याचेआदेश दिले शिवाय असे आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचासुद्धा इशारा दिला.संचालक मंडळाने घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल शेतकरी वर्गाकडून नितीन हटवार, डॉ. नरेंद्र निर्मळ,मनोज मोरे, मंगेश चोपडे, राजेश्वर खडसे, उमेश चोपडे, राजहंस चोपडे आदींनी सभापती हरीश मोरे व उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या, शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्या, तसेच मातेराचा देखील प्रश्न निकाली काढावा अशी मागणी देखील यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
‘या हंगामात कापसाला कवडीमोल भाव आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. केंद्र व महाराष्ट्र सरकारने कापुस आणि सोयाबीन बद्दलचे धोरण बदलवून शेतकऱ्यांचा मालाला अधिकाधिक भाव कसा मिळेल या करीता ताबडतोब निर्णय घ्यावा.अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही.’
●नितीन हटवार