गावात स्वच्छता करून कर्मयोगी गाडगे बाबा यांना अभिवादन प्रज्ञा स्पर्श संस्था व धम्मांकुर नवयुवक संस्थेचा पुढाकार
■मिररवृत्त
■नांदगाव पेठ
कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून आज 20 डिसेंबर रोजी प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्था व धम्मांकुर नवयुवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नांदगांव पेठ येथे स्वच्छता रॅली काढून गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.झाडूच्या माध्यमातून समाजमन स्वच्छ करणारे व बोलीभाषेतून किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा हे अजरामर ठरले आहेत.त्यांच्या सामाजिक विचारांची कास धरुन नांदगांव पेठ येथील प्रज्ञास्पर्श बहुउद्देशीय संस्था व धम्मांकुर नवयुवक मंडळ यांनी संपूर्ण गावात स्वच्छता रॅली काढून व स्वच्छता अभियान राबवून त्यांना अभिवादन केले.यावेळी गावातील अनेक रस्ते उत्स्फूर्तपणे स्वच्छ करण्यात आले. या अभियानाला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद सुद्धा लाभला.
या स्वच्छता रॅलीची सुरुवात कांबळे पुरा येथून भोई पुरा, बनेखा चौक,बारी पुरा,यावले पुरा,संगमेश्वर पुरा,इतवारी पुरा,कुंभार पुरा,माळी पुरा,शिवाजी चौक,मारवाडी पुरा या ठिकाणाहून मार्गक्रमण करून कांबळे पुरा येथील बुध्द विहार येथे समारोप करण्यात आला.
या स्वच्छता अभियानात सुमेद कांबळे, राहुल कांबळे, अमोल कांबळे, विक्की मनोहरे, पंकज तलवारे, अभय पाटील, स्वरीत कांबळे, आदित्य कांबळे, सूर्या धाकडे, गोलू गडलिंग, सुरेश कांबळे, आशिष कांबळे, प्रशिक इंगोले, आर्यन कांबळे यांचेसह अनेक युवकांनी सहभाग घेतला होता.
*■गाडगेबाबांची वेशभुषा ठरली आकर्षण■
स्वच्छता रॅली व अभियान राबवितांना गणेश कांबळे यांनी हूबेहुब कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची वेशभुषा साकारली होती. त्यामुळे प्रत्यक्ष गाडगेबाबाच अवतरले की काय? असा आभास निर्माण झाला होता व त्यांना बघण्यासाठी गावातील असंख्य नागरिकांनी सुद्धा एकच गर्दी केली होती. तसेच यावेळी गाडगेबाबांचे भजन “गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला, सांभाळही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला” हे भजन सुद्धा गायले. तसेच या प्रसंगी गाडगेबाबांची दशसुत्रीचा अवलंब करावा असा संदेश सुद्धा यावेळी देण्यात आला.