spot_img

‘तो’ बिबट अजूनही तिथेच, वराह व श्वानांची शिकार करून भागवतोय भूक

‘तो’ बिबट अजूनही तिथेच, वराह व श्वानांची शिकार करून भागवतोय भूक

●मुख्य वनसंरक्षकांना पाठवला ‘त्या’ बिबट्याचा महिन्याभराचा ट्रॅकिंग अहवाल

●परवानगी मिळताच हाती घेणार रेस्क्यू ऑपरेशन-उप वनसंरक्षक मिश्रा

●मिररवृत्त
●अमरावती

गेल्या महिन्याभरापूर्वी शहरातील विदर्भ महाविद्यालय परिसरात दिसलेला बिबट अजूनही तिथेच दडून बसलेला आहे. या परिसरात वराह व भटक्या श्वानांची संख्या जास्त आहे. अनेक जुन्या जीर्ण इमारती व झाडा-झुडपांनी वेढलेला हा परिसर असल्यामुळे या भागात ‘त्या’ बिबट्याची राहण्या-खाण्या-पिण्याची चांगली सोय आहे. गेल्या महिन्याभरात अनेकदा त्याच्या हालचाली वन विभागाने टिपल्या असून तसा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांना पाठवण्यात आला आहे. सदर बिबट्यास या भागातून वन्य परिसरातील सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्यासाठीची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना मागितली आहे. सदर परवानगी प्राप्त होताच त्या बिबट्याला जेरबंद करण्याचे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात येईल, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक हालचालीवर वन विभागाची चमू नजर ठेऊन असल्याची माहिती उप वनसंरक्षक अमित मिश्रा यांनी दिली.

सध्या जिथे त्या बिबट्याचा अधिवास आहे तो विदर्भ महाविद्यालयाचा परिसर घनदाट झुडपांचा असून यापूर्वी देखील या परिसरात बिबट्या बराच काळ राहिला आहे. त्याला या दाट मानवी वस्ती असलेल्या परिसरातून बाहेर काढून त्याचे नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रयत्न वन विभागाकडून केला जाणार आहे. सध्या त्या बिबट्याच्या हालचाली केवळ रात्री उशिराच होत आहेत. त्यामुळेही वन विभागाच्या कारवाईवर निर्बंध आड येत आहेत. कारण बिबट्या किंवा कुठल्याही वन्य प्राण्यांना रात्री अंधार पडल्यावर पकडण्याचे त्यांना बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्याचे नियम नाही. एकूणच अंधार पडल्यावर बिबट्या असो किंवा कुठल्याही वन्य प्राण्याला पकडणे गुन्हाच ठरतो असेही प्रादेशिक उप वनसंरक्षक अमित मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळे वनविभागाचे पथक रात्री केवळ त्या बिबट्यावर लक्ष ठेवून आहेत. हा बिबट्या नागरी वसाहतीतून सुखरूप जंगल परिसरात कसा जाईल यासाठीच वनविभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रादेशिक उप वनसंरक्षक म्हणाले.

■…तर आम्हाला द्या परवानगी ■
गेल्या महिन्याभरापासून एक बिबट विदर्भ महाविद्यालय परिसरात ठाण मांडून आहे. वन विभागाने त्याला तत्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कारवाई पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु वनविभाग नानाविध कारणे उपस्थित करून कारवाईस टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जर वन विभागाला त्या बिबट्यास जेरबंद करून सुरक्षित स्थळी हलवणे शक्य नसेल तर मग आम्हाला परवानगी द्यावी. आम्ही सर्व नियमांचे पालन करून त्या मानवी वस्तीतील बिबट्याला पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पोहचवू व नागरिकांना भीतीच्या सावटातून मुक्त करू असा प्रस्ताव वन्यजीव प्रेमी सागर मैदानकर यांनी वन विभागाला दिला आहे. सोमवारी (ता.११) जिल्हाधिकाऱ्यांनाही तसे निवेदन व तक्रार करणार असल्याचेही मैदानकर यांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!