नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे जिल्हाधिकारी सौरभ कटियार

0
93

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे
जिल्हाधिकारी सौरभ कटियार

जिह्यात विविध ठिकाणी विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन

विभागीय आयुक्तांकडून निवडणुक कामकाजांचा आढावा

_अमरावती, दि. 25 : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. त्यासाठी 17 व 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी मतदार यादीत त्यांच्या नावाची अवश्य नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रात मतदारांच्या नोंदणीसाठी आयोजित विशेष शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले._

येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष नोंदणी शिबीराची जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी करुन विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण व विकास प्रबोधिनीचे संचालक तथा समन्वय अधिकारी अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नव मतदारांच्या नोंदणीसाठी 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर दरम्यान विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत 1 जानेवारी 2024, 1 एप्रिल 2024, 1 जुलै 2024 तसेच 1 ऑक्टोंबर 2024 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी, विद्यार्थ्यांनी मतदार यादीत त्यांच्या नावाची नोंदणी करावी. तसेच जे मतदार इतर मतदार संघात स्थांनातरित झाले आहे किंवा इतर मतदार संघातून या ठिकाणी आले आहेत, अशांचा शोध घेऊन मतदार यादींचे नुतणीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची तपासणी करावी. काही सुधारणा करावयाची असेल तसे संबंधित मतदान केंद्राधिकारी यांना कळवावे, असेही श्री. कटियार यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मतदार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात येत आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. भारत निवडणूक आयोगाव्दारे मतदार नोंदणी व मतदार कार्ड मिळण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमूना 6, नमूना 7 ग्राम, तालुका व जिल्हास्तरावरील सर्व मतदान केंद्रावर व महसूल विभागाच्या निवडणूक शाखेत उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे श्री. कटियार यांनी सांगितले.

महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी मतदानाचे महत्व इतरांना पटवून देत मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ‘मतदार जनजागृती क्लब’ची स्थापना करावी. ‘मतदार जनजागृती मित्र’ म्हणून याविषयी इतरांना मार्गदर्शन करावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या सादरीकरणातून मतदानाच्या जनजागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

विभागीय आयुक्तांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा व मतदान केंद्रास भेट

तत्पूर्वी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत झालेले कामकाज, स्वीप मोहिम, तालुकानिहाय मतदारांची संख्या, मतदान केंद्रे, मतदान जागृती आदीबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून उपरोक्त बाबींची माहिती दिली.

त्यानंतर डॉ. पाण्डेय यांनी बडनेरा मतदार संघातील सामरा हायस्कुल येथील मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच मतदार नोंदणी, मतदान जनजागृतीबाबत आवश्यक सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here