spot_img

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच आरोपीचे मनोबल उंचावले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचा आरोप,जखमी युवतीची घेतली भेट

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच आरोपीचे मनोबल उंचावले

शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचा आरोप,जखमी युवतीची घेतली भेट

●मिररवृत्त
●अमरावती

महाविद्यालयीन युवतीवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहे .परंतु पोलिसांनी कारवाई करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे आरोपीचे मनोबल उंचावले आणि ही घटना घडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी करीत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजापेठ अंडरपास परिसरात बुधवारी एका महाविद्यालयीन युवतीवर माथेफिरू युवकाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली .सदर युवतीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी जखमी युवतीची भेट घेऊन तिला धीर देत शिवसेना भावाप्रमाणे पाठीशी असल्याचा विश्वास दिला. याप्रसंगी बोलताना सुनील खराटे म्हणाले, की जखमी युवतीला आरोपी हा अनेक महिन्यांपासून त्रास देत आहे. सदर युवतीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध यापूर्वी पोस्को कायद्यान्वये गुन्हा देखील दाखल आहे. परंतु पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता हलगर्जीपणा केल्यामुळे आरोपीचे मनोबल उंचावले आणि युवतीच्या जीवावर बेतनारी घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने युवती बचावली असली तरी पोलिसांनी मागील प्रकरण गांभीर्याने घेत आरोपीवर कठोर कारवाई केली असती तर आजची घटना घडलीच नसती असे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी म्हटले आहे. या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थाचा बोजवारा उडाला असून युवती व महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप करीत पोलिसांनी या घटनेतील आरोपीवर तसेच छेड खानीच्या प्रकरणांमधील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यात धाक निर्माण करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केली आहे.

●दामिनी पथक गायब●

महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थिनींच्या होणाऱ्या छेडखानींच्या प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत दामिनी पथक गठीत करण्यात आले आहे .परंतु शाळा व महाविद्यालय परिसरात लक्ष ठेवून असणारे दामिनी पथक शहरातून गायब झाल्याचा आरोप सुनील खराटे यांनी करीत दामिनी पथक सक्रिय असते तर शहरात होणाऱ्या घटनांना पायबंद बसला असता असे त्यांनी म्हटले आहे .

●तक्रार पेटीकडे पोलिसांचे दुर्लक्ष●

अमरावती शहरात एकतर्फी प्रेमातून दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनांची गंभीर दखल घेत महाविद्यालय व शाळांमध्ये तक्रार पेट्या लावण्याचे निर्देश दिले होते. सोबतच तक्रार पेटीमधून येणाऱ्या तक्रारींची शहानिशा करीत मुलींना विश्वासात घेत संशयित आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते .परंतु सध्या बहुतांश शाळा व महाविद्यालयांमध्ये लावलेल्या पेट्यांना उघडून बघण्याचे सौजन्य पोलीस दाखवीत नाही किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक तक्रारपेटी विशिष्ट दिवसांमध्ये उघडून येणाऱ्या तक्रारीवर कारवाई करण्याचे निर्देश अधिनस्त अधिकाऱ्यांना द्यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!