spot_img

राज्यातील 434 आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे थाटात लोकार्पण,संविधान मंदिर:राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतिक- खा.अनिल बोंडे

राज्यातील 434 आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे थाटात लोकार्पण

●संविधान मंदिर:राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतिक- खा.अनिल बोंडे

●मिररवृत्त
●अमरावती

सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारतीय संविधानातून मिळत असल्यामुळे, राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण आज झाले, ही अत्यंत गौरवाची बाब असून महत्वाचा प्रसंग आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समानता व बंधुता या मुलभूत घटकांविषयी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संविधान मंदिर हे राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या एल्फिन्‍स्टन तांत्रिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राज्यातील 434 आयटीआयमध्ये स्थापित संविधान मंदिरांचेही उपराष्ट्रपतींच्या हस्ते एकाचवेळी आभासी पध्दतीने लोकार्पण झाले. मुंबई येथील कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विभागाचे सचिव गणेश पाटील तर अमरावतीच्या आयटीआयमधील कार्यक्रमात आमदार सौ. सुलभाताई खोडके, महसूल सह आयुक्त संजय पवार, प्रभारी उपंसचालक संजय बोरकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुंबईच्या एल्फिन्‍स्टन तांत्रिक विद्यालय येथील संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रक्षेपित करण्यात आले.
डॉ. बोंडे म्हणाले की, सन 1947 ला देश स्वतंत्र झाल्यावर लोकांना त्यांचे कर्तव्य, अधिकार यासंबंधी व्यवस्थापन तसेच सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना भारतीय संविधान वाचून त्यातील मूल्य, अधिकार आणि कर्तव्य, न्यायव्यवस्था, घटनेतील कलमे आदी संदर्भात माहिती करुन घ्यावी. तसेच त्याचा वापर लोकहितासाठी कसा करता येईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. भारत हा लोकशाहीप्रदान देश असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी योगदान देणे आवश्यक आहे. देश सुरक्षित करावयाचा असल्यास देशाच्या चर्तुसीमा सुरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुण-तरुणींनी भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवा करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आयटीआयमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटने विषयी इंतभूत माहिती व्हावी, यासाठी संविधान मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश करतेवेळी राज्यघटनेतील उद्देशिकेचे नियमितपणे वाचन करावे. त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेवून तो आचरणात आणावा. राज्यघटनेतील महत्वाच्या पैलूंवर सौ. खोडके यांनी प्रकाश टाकला. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन आमदार सौ. खोडके यांनी यावेळी केले.
राज्यातील प्रत्येक आयटीआयमध्ये संविधान मंदिराची निर्मिती करणे, ही अतिशय सुंदर संकल्पना असून विद्यार्थ्यांनीही आपले करिअर करताना त्याचा उपयोग करुन घ्यावा. अशा कार्यक्रमातील महत्वाच्या वक्त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन योग्य मार्ग निवडून चांगले भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन सह आयुक्त श्री. पवार यांनी केले.

विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे नियमित वाचन करुन त्यातील स्वातंत्र्य, समानता व बंधूता या घटकांचा आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोग करावा. विद्यार्थी दशेत असताना चांगल्या गुणांचा अंगिकार करुन मिळालेल्या संधीच सोन करावं, उत्तम करिअर घडवावे, असे मार्गदर्शन प्र. उपसंचालक श्री. बोरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.यावेळी उपस्थित सर्वांद्वारे भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती पल्लवी वैद्य यांनी केले तर निलेश रोंघे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिल्प निदेशक, शिक्षक वृंद-कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!