spot_img

महाराष्ट्रातले एकमेव पार्थिव मूर्ती गणेश मंदिर अमरावतीत, हरिश्चंद्र पाटलांच्या गणपतीला 350 वर्षांचा इतिहासाची जोड

महाराष्ट्रातले एकमेव पार्थिव मूर्ती गणेश मंदिर अमरावतीत

●हरिश्चंद्र पाटलांच्या गणपतीला 350 वर्षांचा इतिहासाची जोड
●दरवर्षी घरीच तयार होते मातीची भव्य श्रीमूर्ती
●7 पिढयांपासून वंश परंपरेचे निर्वहण

●मिररवृत्त
●अमरावती

महाराष्ट्रातले एकमेव पार्थिव (दरवर्षी हाताने तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची स्थापना) गणेश मंदिर हे अमरावतीच्या तारखेडा येथे आहे. येथील गणपतीला 350 वर्षांचा इतिहासाची जोड लाभली असून हरिचंद्र पाटलांच्या 7 पिढयांपासून वंश परंपरेचे अविरत निर्वहण होत आहे. 1835 साली जन्मलेले हरिश्चंद्र नारायणजी पाटील हे अमरावतीचे मोकद्दम देशमुख होते. गावात त्यांचं मानाचं स्थान होतं. मुनी महाराजांची गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी त्यांच्या वाड्यात सुरू केली. त्यात लोकांचा सहभाग वाढला. परंपरेने ते स्वतः गणपतीची मातीची मूर्ती तयार करत. त्याला आकर्षक रंग देत. मुनी महाराज छोटी मूर्ती तयार करायचे. त्यांच्यानंतर हरिश्चंद्र पाटलांनी मात्र मोठी मूर्ती बनवायला सुरुवात केली. पूर्वीच्या फूट-दीड फूटाच्या मूर्तीच्याजागी आताची पाच- सहा फुटांची मोठी मूर्ती आली. तारखेड्यातला हा उत्सव तर हरिश्चंद्र पाटलांचा गणपती म्हणूनच पुढे फेमस झाला. तो आजतागायत आहे.
मुनी महाराजांची गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहे. दरवर्षी गणेशोत्सवात स्वतः हाताने बनवलेली मूर्ती ते स्थापन करायचे. दरवर्षी हाताने बनवलेली मातीचीच मूर्ती हवी, हा मुनी महाराजांचा आग्रह असायचा. अगदी मुनी महाराजांपासून इथं हातानेच मूर्ती तयार करण्याची परंपरा आहे. इथली मूर्ती विकत आणली जात नाही. त्याची विधिवत पूजा करायचे. त्यांच्या सात पिढ्यांची गणेशोत्सवाची परंपरा म्हणजे अमरावतीचा सांस्कृतिक वारसाच होय. मुनी महाराजांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी गणेशाच्या समोरच बांधली आहे. आदल्यावर्षीची मूर्ती ही नव्या मूर्तीने रिप्लेस होते. जुनी मूर्ती बाजूला ठेवतात. नव्या मूर्तीची स्थापना होते.

●मूर्तीचं ‘तेज’ टिकते वर्षभर●

ही मूर्ती वर्षभर टिकवण्यासाठी कोणतेच केमिकल्स वापरले जात नाहीत हे विशेष. काळी माती, भसवा माती, राख, रुई आणि घोड्याची लीद मूर्ती तयार करण्यासाठी वापरतात. भसवा ही विशिष्ट माती कुंभाराकडून आणतात. ही मूर्ती आतून पोकळ असते. मूर्ती क्रॅक होऊ नये यासाठी विशिष्ट तंत्राने बनवली जाते. मूर्तीला आतून-बाहेरून गोवऱ्यांचा शेक दिला जायचा. त्यामुळे ही मूर्ती वर्षभर तशीच राहते. उच्च प्रतीचे रंग वापरले जातात. त्यामुळे मूर्तीचं ‘तेज’ देखील बराच काळ कायम राहतं. हरिश्चंद्र पाटील स्वतः हाताने मातीचा गणपती तयार करत. नंतर बाजीराव यांनी ही परंपरा चालवली. त्यांच्यानंतर गजाननराव मूर्ती करायचे. असं करत ही परंपरा रामरावांकडे आली. वंशपरंपरनेने आता रामरावांचे पुत्र शाम पाटील या परंपरेचे निर्वाचन करीत आहेत.
हि मूर्ती तयार करण्यासाठी कोणताही साचा किंवा केमिकल्सचा वापर होत नाही. दोन महिन्यांपूवीच ते मातीच्या मूर्तीचं काम सुरू करतात. माती, घोड्याची लीद याची प्रक्रिया तर उन्हाळ्यापासूनच सुरू व्हायची. जवळपास ही पाच फुटांची मूर्ती आहे. संपूर्ण मूर्ती हाताने करतात. पूर्वी ही मूर्ती वाळल्यावर त्याला शेंदूर लावायचे. मात्र अलीकडच्या काळात ती आकर्षक रंगांनी रंगविली जाते. असे शाम पाटील यांनी सांगितले.

●विसर्जन नाकरल्याचा फटका!●

श्याम पाटील यांनी जुनी आठवण सांगताना सांगितले कि, पूर्वी येथील मूर्तीचे विसर्जन एकविरा देवी मंदिरातील विहिरीत व्हायचे परंतु त्यांनतर गांधी चौक येथील तुळजागीर वाडा येथील विहिरीत विसर्जन सुरु झाले. दरम्यान सुमारे अठरा वर्षांआधी तुळजागीर वाड्यातील विहिरीत मूर्ती विसर्जनास ऐनवेळेवर (विसर्जन मिरवणूक पोहचली असता) मनाई केली म्हणून सदर मूर्ती तारखेडा परिसरातीलच एका विहिरीत विसर्जित करण्यात आली होती. परंतु त्यावर्षी मोठी घटना घडली. कधीही न आटलेली तुळजागीर वाड्यातली विहीर आटली.परिसरात रोगराई पसरली. बाप्पांची श्री मूर्तीचे विसर्जन नाकरल्याचा फटका असल्याची धारणा त्यावेळी सगळ्यांची झाली. त्यांनतर त्यांनी पुन्हा मूर्ती विसर्जनाची परंपरा अविरत ठेवण्याचा आग्रह केला, तेव्हापासून पुन्हा त्याच तुळजागीर वाड्यातील विहिरीतच या मूर्तीचे विधिवत विसर्जन केल्या जाते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!