खर्च परवडेना, अमरावती विद्यापीठाने बंद केले तब्बल 4 अभ्यासक्रमः व्यवस्थापन परिषदेचा कठोर निर्णय, वाणिज्य, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र विभागावर टाच
●मिररवृत्त
●अमरावती
सामान्य निधीवरील (जनरल फंड) बोजा कमी करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने कठोर पावले उचलायला प्रारंभ केला आहे. त्याचे प्रत्यंतर म्हणून पदव्युत्तर पदवीचे (पीजी) तब्बल चार अभ्यासक्रम बंद केले आहेत. वाणिज्य, अर्थशास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र हे ते चार अभ्यासक्रम असून यावर्षी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
सन २०१६-१७ साली १२८ कोटी रुपये असलेला विद्यापीठाचा सामान्य निधी गेल्या काही दिवसांपूर्वी अगदी शून्यावर आला होता. विद्यापीठाच्या वाहनांमध्ये इंधन भरायलाही पैसा उरला नाही, अशी या निधीची स्थिती झाली होती. त्यामुळे स्वतः विद्यापीठ प्रशासनाने खर्चविषयक बाबींचे अवलोकन सुरु केले. त्यानंतर बरेच फेरबदल करण्यात आले. त्या फेरबदलाचाच एक भाग म्हणून चार विभाग बंद करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्तुळातील तज्ज्ञांच्या मते सदर चारही विषयांचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे उगाच खर्च वाढवत हे विभाग सुरु ठेवण्याची काहीही गरज नाही. हा निष्कर्ष सर्वांना पटल्यानंतर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देणारे वाणिज्य, अर्थशास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र हे चारही अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहेत.
डॉ. मुरलीधर चांदेकर कुलगुरु असताना सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले होते. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ८ ते १० याप्रमाणे सुमारे तासिका तत्वावरील ४० शिक्षक त्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. मात्र सहा वर्षाच्या शैक्षणिक कामकाजानंतर आता या विषयांचा प्रवास थांबविण्यात आला आहे. त्यामुळे आपसुकच सामान्य निधीवरील ताण कमी झाला असून इतर कामकाज सुलभतेने पुढे नेण्यास मदत होणार आहे. दरम्यान विद्यापीठाचे नियमित कामकाज सुलभतेने सुरु ठेवण्यासाठी प्रशासनाने अलिकडेच घसारा निधीतून १० कोटी रुपये उधार घेतले आहेत.
●’त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार●
दरम्यान जे विद्यार्थी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात पोहोचले आहेत, त्यांना वर्षभर शिकवले जाणार असून त्यांची परीक्षादेखील घेतली जाणार आहे. परंतु नव्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्रापासून हा विभाग पुर्णतः बंद होणार आहे.