spot_img

दुचाकीच्या धडकेत ग्रा.पं.कर्मचाऱ्याचा मृत्यू १ जखमी, माहुली जहागीर येथील घटना

दुचाकीच्या धडकेत ग्रा.पं.कर्मचाऱ्याचा मृत्यू,१ जखमी

◆माहुली जहागीर येथील घटना

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

लग्नकार्यातून जेवण करून पायदळ घरी परततांना मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात माहुली जहागीर ग्रामपंचायतचे कर्मचारी ज्ञानेश्वर पुंडलिकराव गूल्हाने (५८) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.तर घटनेतील अन्य एक कर्मचारी गजानन सपकाळ यांच्या हाताला दुखापत झाली असून ते सुद्धा जखमी असल्याची माहिती आहे.याप्रकरणी माहुली जहागीर पोलिसांनी दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार आहे.
घटनेचे सविस्तर वृत्त असेकी, माहुली जहागीर ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ज्ञानेश्वर गुल्हाने हे माहुली जहागीर ग्रामपंचायतला लिपिक पदावर कार्यरत होते तर गजानन सपकाळ हे सुद्धा याच ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी म्हणून आहेत. गुरुवार दि.४ जुलै रोजी रात्री स्थानिक दुर्गेश्वरी मंगल कार्यालय येथे एका लग्नकार्याला उपस्थित राहण्याकरिता दोघेही कर्मचारी गेले. रात्री दहा वाजता गुल्हाने व सपकाळ दोघेही जेवण करून पायदळ घरी येत असतांना माहुली ते मोर्शी या मार्गावर मागून दारूच्या नशेत भरधाव येणाऱ्या दुचाकी क्र. एम एच २७,सी एच ९३०९ च्या चालकाने साडे दहा वाजताच्या दरम्यान पायदळ चालणाऱ्या दोघांनाही जबर धडक दिली.
यामध्ये ज्ञानेश्वर गुल्हाने यांच्या पायाला,डोक्याला, व कमरेला जबर मार लागला तर गजानन सपकाळ यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आकाश गुल्हाने व इतर मित्रांनी दोन्ही जखमींना अमरावतीयेथील खासगी रुग्णालयात दाखल केले.गुल्हाने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने शुक्रवारी दुपारी साडे चार वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान ज्ञानेश्वर गुल्हाने यांची प्राणज्योत मालवली.घटनेने माहुली जहागीर गावावर शोककळा पसरली असून शांत, संयमी आणि गोरगरिबांना मदत करणारे ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर गुल्हाने यांच्या अचानक जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असून शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर माहुली जहागीर येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
घटनेनंतर आरोपी दुचाकीचालकाला नागरिकांनी माहुली पोलिसांच्या स्वाधीन केले होते मात्र काही वेळानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन मधून आरोपी युवकाला घरी नेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. माहुली जहागीर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून आरोपी दुचाकीचालकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१,१२५(ब),१०६ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!