spot_img

आधार अपडेटच्या नावावर वाघोलीच्या वृद्ध महिलेची शेती हडपली,प्लॉटही विकला, गुंगीचे औषध देऊन बँकेतील तेरा लाखांची रक्कमही काढली, माहुली पोलिसांनी साधा गुन्हा देखील दाखल केला नाही

आधार अपडेटच्या नावावर वाघोलीच्या वृद्ध महिलेची शेती हडपली,प्लॉटही विकला

◆गुंगीचे औषध देऊन बँकेतील तेरा लाखांची रक्कमही काढली
◆माहुली पोलिसांनी साधा गुन्हा देखील दाखल केला नाही

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

नजीकच्या माहुली जहागीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली येथील अशिक्षित आणि निराधार असलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचे आधार अपडेट करण्याच्या नावाखाली गावातीलच एका कुटूंबाने तिची दोन एकर शेती हडपल्याचा आरोप वृद्ध महिलेने केला आहे.विशेष म्हणजे महिलेच्या खात्यातील १३ लक्ष तीस हजार रुपयांची रक्कम सुद्धा संबंधीत कुटुंबाने परस्पर काढली असून याबाबत मात्र माहुली जहागीर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नसून याउलट तक्रार दिल्याच्या चार महिन्यानंतर माहुली जहागीर पोलिसांनी सदर प्रकरण दिवाणी असल्याने आपण न्यायालयात दाद मागावी असे पत्र देऊन या प्रकरणावर पडदा टाकला.
तक्रारदार नीता झांगोजी मनोहर (७०) ही वृद्ध महिला वाघोली येथे एकटीच राहते.एमआयडीसीमध्ये शेत गेल्याने शेतीचा मोबदला म्हणून त्यांना काही रक्कम मिळाली होती.ती माहुली जहागीर येथील दोन वेगवेगळ्या बँकेत जमा होती तर मौजा वाघोली गट क्र.२०५,ज्याचे क्षेत्रफळ ०.६९ हे.आर हे शेत आणि मौजे अमन्नापूर,नांदगाव पेठ सर्वे नं.१७,प्लॉट क्र ५५ ब हा प्लॉट तक्रारकर्त्या वृद्ध महिलेच्या नावे होता. महिलेच्या ओळखीतील तसेच त्याच गावात रहिवासी असलेले विजय रवी मोहिते (२२),अक्षय रवी मोहोते (२५),विशाल रवी मोहिते (२०),प्रमिला रवी मोहिते (५०) हे त्या वृद्ध महिलेच्या संपर्कात असल्याने व वारंवार ये जा असल्याने यांनी वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन २४ जुलै २०२३ रोजी अमन्नापूर,नांदगाव पेठ सर्वे नं.१७,प्लॉट क्र ५५ ब हा १२७० स्क्वे फूट प्लॉट परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकला.त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२३ रोजी वृद्ध महिलेला आधार कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अमरावती तहसील येथे घेऊन गेले आणि वृद्ध महिलेच्या नावे असलेले २ एकर शेती स्वतःच्या नावे खरेदी केले.
याशिवाय ८ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा माहुली जहागीर येथील बँकेतून ११,३०७०० रुपये,१० ऑगस्ट २३ ला ४८२०,व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माहुली जहागीर या बँकेतून २० ऑगस्ट २३ रोजी धनादेशद्वारे २ लक्ष रुपयांची रक्कम मोहिते कुटुंबीयांनी परस्पररित्या विड्रॉल केली.फेब्रुवारी २०२४ मध्ये हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेने तिच्या कुटुंबातील काही व्यक्तींना ही बाब सांगितली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे समजले.वृद्ध महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी मोहिते कुटुंबियांशी संपर्क केला असता त्यांनी तुमच्याकडून काय होते ते करून घ्या असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे भयभीत झालेल्या वृद्ध महिलेने कुटुंबातील काही सदस्यांना सोबत घेऊन माहुली जहागीर पोलीस स्टेशन येथे १७ फेब्रुवारी २४ रोजी लेखी तक्रार दिली मात्र पोलिसांनी थातूरमातूर चौकशी करून तपास अधिकारी पोउनि अमोल मानतकर यांनी ४ जून २४ रोजी वृद्ध महिलेला सूचनापत्र देऊन सदर प्रकरण हे दिवाणी असल्याने आपण दिवाणी न्यायालयात दाद मागावी करिता आपली तक्रार निकाली काढण्यात येत असल्याचे पत्र दिल्याने माहुली जहागीर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, वृद्ध महिलेचा मानसिक छळ, जातीवाचक शिवीगाळ असे आरोप असूनही पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे का दाखल केले नसावे हा विषय चर्चिला जात आहे तर दुसरीकडे आपली शुद्ध फसवणूक झाली असून आपल्याजवळ असलेली म्हातारपणाची पुंजी लुटली गेल्यामुळे विवंचनेत असलेल्या वृद्ध नीता मनोहर न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!