spot_img

प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या, पत्नीने रचला हत्येचा कट

प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या

◆पत्नीने रचला हत्येचा कट
◆हत्या करून मृतदेह कठोरा गांधी मार्गावरील नाल्यात फेकला
◆पत्नीसह मृतकाच्या तीन मित्रांना अटक

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

गेल्या काही दिवसांपूर्वी कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलीसांनी चौकशी केली असता प्रेमप्रकरणात अडसर ठरलेल्या पतीची त्यांच्या पत्नीने कट रचून व मित्रांच्याच मदतीने निर्घृण हत्या केल्याची बाब पुढे आली आहे.भारतीय सेनेमधून निवृत्त झालले माजी सैनिक तथा रेल्वेत नोकरीला असलेले मिलिंद सौदागर वाघ (४२) रा. अनंत विहार कॉलनी, शेगावनाका, अमरावती असे मृतकाचे नाव असून नांदगाव पेठ पोलिसांनी एका महिलेसह तीन युवकांना याप्रकरणी अटक केली आहे.
घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मृतक मिलिंद हे भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये उदखेड येथे रेल्वेगेटवर गार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांना सेनेची पेन्शन व रेल्वेचा पगार सुरू होता. परंतु, काही महिन्यांपासून त्यांची पत्नी राहते घर व पेन्शन नावाने करून घटस्फोट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होती. याच कारणांवरून वाद वाढल्याने त्यांची पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहत होती. मृतक मिलिंद हे त्यांचा लहान भाऊ प्रशांत सौदागर वाघ (३२) रा.न्यू तापडीया नगर, अकोला यांच्याशी नेहमी संपर्कात राहत असून त्यांना पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगत होते.
अशातच १६ पासून एप्रिल पासून मिलिंद यांचा फोन लागत नसल्याने प्रशांत वाघ हे अमरावतीत त्यांच्या घरी आले. सर्वत्र शोध घेऊन ते मिळून न आल्याने अखेर प्रशांत वाघ यांनी याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गाडगेनगर पोलिसांनी मिलिंद यांची शोधमोहिम सुरू केली असता काही दिवसांपूर्वी नांदगावपेठ पोलिसांना कठोरा गांधी मार्गावरील राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला. प्रशांत यांनी मिलिंद यांचा मृतदेह ओळखला आणि त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात पत्नीविषयी हत्येची तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तपासात एक भयानक हत्याकांड समोर आले. आरोपी महिलेने घर, पेन्शन नावाने करून देण्यासाठी आणि त्यानंतर घटस्फोट देण्यासाठी मिलिंद वाघ यांच्यावर दबाव आणत होत्या. मिलिंद यांचे दुसऱ्या महिलेसोबत सुत जुळले असून ते तिच्या नावाने पेन्शन करून देतील, असा संशय आरोपी महिलेला होता. आरोपी शुभम, संकेत व कार्तिक हे तिघेही नेहमी मिलिंद यांच्यासोबत दारू पित होते. त्यामुळे पत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा कट रचला. १८ एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले आणि त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. आकस्मिक मृत्यूचा बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला. या संपूर्ण बाबी तपासात उघड झाल्यानंतर नांदगावपेठ पोलिसांनी मिलिंद वाघ यांच्या आरोपी पत्नीसह शुभम देविदास भोयर (१९), रा.आम्रपाली नगर अमरावती, संकेत अशोकराव बोळे (२९), रा.आशियाड कॉलनी, कार्तिक मुरलीधर कडूकर (१९) रा. मार्बल लाईन, शेगाव नाका अमरावती यांना ताब्यात घेतले. अटक होताच आरोपींनी मिलिंद वाघ यांच्या हत्येची कबूली दिली. चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करित आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!