काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात
◆ट्रकने पाठीमागून दिली धडक
◆काँग्रेसने व्यक्त केला घातपाताचा संशय
◆मिररवृत्त
◆भंडारा
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री (दि.९) अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली.या अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत.
अपघातावरुन काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे.
◆अतुल लोंढेंचे ट्विट काय?◆
अतुल लोंढे म्हणाले की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री भिलवाडा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.
◆नेमके काय घडले?◆
नान पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकनं जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातामध्ये नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षीत आहेत. पोलिसांकडून या अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ट्रकचं नित्रयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून हा अपघात झाला आहे.