निवडणुकीच्या जनआंदोलनातील लढ्याला यशस्वी करा-बच्चू कडू
◆प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारार्थ तिवसा येथे
बैठक
◆मिररवृत्त
◆तिवसा
अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी प्रहारने दिनेश बूब सारखा हक्काचा माणूस लोकसभेच्या रिंगणात उभा केला असून या निवडणुकीला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या जनआंदोलनाच्या लढ्याला यशस्वी करून दिनेश बूब यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन प्रहारचे सर्वेसर्वा आ.बच्चू कडू यांनी तिवसा येथे केले.अमरावती लोकसभा मतदार संघातील प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारार्थ तिवसा येथे प्रहार पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.
तिवसा येथील आयोजित या बैठकीला आ. राजकुमार पटेल, प्रहारचे उमेदवार दिनेश बूब, प्रहारचे विदर्भ अध्यक्ष प्रमुख संजय देशमुख,तिवसा तालुकाध्यक्ष योगेश लोखंडे, शहर प्रमुख बाळा देशमुख, संघटक गजूभाऊ कडू, उपशहर प्रमुख मनोज काळमेघ, राहुल अंबुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर बैठकीला मार्गदर्शन करतांना आ. राजकुमार पटेल यांनी विद्यमान खासदारांवर घणाघात करिय त्यांच्यामुळे अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भाग विकासापासून दूर राहला असून अश्या खासदाराला घरी बसवून दिनेश बूब सारख्या उमद्या व विकासाची जाण असलेल्या आपल्या हक्काच्या माणसाला विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदार संघावर कुठल्याही परिस्थितीत प्रहारचा झेंडा फडकवायचा असून त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करीत दिनेश बूब यांच्या विजयाचा संकल्प करावा असे आवाहन प्रहारचे विदर्भ प्रमुख संजय देशमुख यांनी केले.याप्रसंगी बोलतांना उमेदवार दिनेश बूब यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप सादर करीत जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा असून माझा विजय म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ते व जनतेचा विजय असे समजून कामाला लागण्याचे आवाहन करीत प्रहारच्या विजयाचा संकल्प करण्याची विंनंती केली.
या तालुकास्तरिय बैठकीला तिवसा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखा प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.