सिटीलँड मध्ये नायकी व पुमा चे बनावट कपडे बनविण्याचा गोरखधंदा
◆दिल्ली येथील अधिकाऱ्यांच्या धाडीने खळबळ
◆दोन दुकानांवर कार्यवाही,आरोपींना अटक
◆साडे नऊ लाखांचे बनावट कपडे व साहित्य जप्त
●मिररवृत्त
●नांदगाव पेठ
कापड व्यवसायासाठी संपूर्ण देशात नामांकित असलेल्या सिटीलँड या व्यापारी संकुलात नायकी आणि पुमा या ब्रँडेड कंपनीचे बनावट कपडे बनविण्याचा गोरगधंदा नुकताच उघडकीस आला.दिल्ली येथील युनायटेड अॅण्ड युनायटेड टेडमार्क कंपनीच्या इन्फोर्समेन्ट अधिकाऱ्यांनी नांदगावपेठ सीटीलॅण्ड व्यापारी संकुलात बनावट कपडे तयार करणाऱ्या दोन दुकानांवर धाडी घातल्या. पोलीस बंदोबस्तात दोन्ही व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या दुकानातून तब्बल ९ लाख ५५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईने सीटीलँड , बिझीलँड व्यापारी संकुलात चांगलीच खळबळ माजली होती.
विशाल जयपालदास साधवानी (३५), सुरज भारतकुमार डोडानी (३१) दोन्ही रा. कृष्णानगर गल्ली क्रमांक – २, कॉटन मार्केट चौक अशी गुन्हे दाखल झालेल्या दोन्ही व्यापाऱ्यांची नावे आहे. सीटीलँड व्यापारी संकुलात विशाल साधवानी यांचे विशाल स्पोर्टस व सुरज डोडानी यांचे सुरज शॉप नामक स्पोटर्स कपडयांचे दुकान आहे. दोन्ही दुकानांमध्ये नाईकी एअर जॉर्डन, पुमासह अनेक नामांकित कंपन्यांचे कपड्यांची विक्री होते. परंतु, दोन्ही आरोपी विशाल व सुरज यांनी कंपन्यांचा असली माल न विकता आपआपल्या दुकानांमध्ये बनावट स्टीकर तयार करून पुमा व नाईकी एअर जॉर्डन कंपनीचे कपडे तयार करायला सुरूवात केली. यासाठी त्यांनी विविध इंटरनॅशनल नामांकित कपन्यांचे हुबेहुब स्टीकर मल्टीकलरव्दारे प्रिन्ट केले, स्टीकर चिपकविण्याची प्रेस, कपडे कापण्याची मशीन विकत घेतली. त्या आधारे नाईकी व पुमा कंपनीच्या तब्बल ११४५ ट्रॅक पॅन्ट तयार केले. प्रत्येक पॅन्टची किमत १५०० ते ३ हजारापर्यंत आहे.
अमरावतीत दोन्ही दुकानांमध्ये बनावट मालाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती दिल्ली येथील युनाटेड अॅण्ड युनायटेड टेडमार्क कंपनीचे इन्फोर्समेन्ट अधिकारी महेश विष्णु कांबळे (४१) रा.सुखदेव विहार, मथुरा रोड, नवी दिल्ली यांना मिळाली. त्यानुसार महेश कांबळे २ मार्चला पथकासह नांदगावपेठ पोलीस ठाण्यात आले. महेश कांबळे यांनी नांदगावपेठ पोलिसांचा रितसर बंदोबस्त घेऊन सिटीलँड मध्ये विशाल स्पोटर्स, सुरज शॉपमध्ये धाड घातली. कंपनीच्या पथकाने येथून तयार केलेले बनावट कपडे, स्टीकर्स, स्पे्र, कपडे कापण्याची मशीनसह एकूण ९ लाख ५५ हजार रूपयांचा ऐवज जप्त करून विशाल साधवानी, सुरज डोडानी यांना अटक केली. महेश कांबळेंनी दोन्ही व्यापाऱ्यांविरोधात तक्रार दिल्यानंतर नांदगावपेठ पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुनीता राजपूत यांनी आरोपींवर कॉपी राईट अधिनियम (संशोधीत)चे कलम ५१,६३ नुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. अटकेनंतर दोन्ही व्यापाऱ्यांना जामिनावर सोडण्यात आले.
◆स्वस्त कापडांसाठी प्रसिद्ध◆
बिझिलँड आणि सिटीलँड दोन्ही कापड मार्केट स्वस्त कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे.दूरवरून नागरिक याठिकाणी कापड खरेदी करायला येतात मात्र अनेक दुकानात असली च्या नावावर नकली कपडे विकले जातात. प्रसिद्ध कंपनीच्या अंडरवेयर आणि बनियानचा सुद्धा बनावट माल अनेक दुकानांमध्ये खुले आम विकला जातो.