मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरण
◆अटकेतील सातही आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर
◆तपासासाठी पोलिसांना करावी लागेल तारेवरची कसरत
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या नांदगाव पेठ येथील मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर पोलीसांनी अत्यंत तांत्रिक पद्धतीने तपास करून बुधवारी रात्री तब्बल सात आरोपींना अटक केली होती. गुरुवारी सातही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या प्रकरणातील सातही आरोपींना जामीन मंजूर केला. सोबतच जे चार आरोपी पोलीस कोठडीत होते त्यांनाही गुरुवारी जामीन मिळाला.
२१ फेब्रुवारी रोजी ड्रीमलँड येथील ए.आर.एन असोसिएट या परीक्षाकेंद्रावर महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचा अराजपत्रित अधिकारी पदाचा पेपर फुटल्याने राज्यभर खळबळ उडाली होती.प्रकरणाचे गांभीर्य बघून नांदगाव पेठ पोलीस आणि गुन्हे शाखेच्या वतीने तांत्रिक तपास करून बुधवारपर्यंत ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यापैकी पहिला आरोपी यश अनंत कावरे याला पोलिसांनी पहिल्या दिवशी ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर यश चे वडील अनंत कावरे यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली तर २६ फेब्रुवारी रोजी राहुल लिंगोट व किशोर डोंगरे यांना अटक करून त्यांना दोन दिवसांची कोठडी मिळाली होती.
याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून २९ फेब्रुवारी रोजी सात आरोपींना अटक केली व त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्र.४ समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मुख्य म्हणजे या प्रकरणात फिर्यादी हाच आरोपी झाल्याने या प्रकरणाचा नवे वळण मिळाले आहे. पेपरफुटीचे मोठे कनेक्शन असून पोलीस मुख्य सुत्रधारांच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहे मात्र पुढे तपास करतांना पोलिसांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
◆तपासावर परिणाम नाही◆
पकडण्यात आलेले सात व आधीचे चार असे अकरा आरोपींना न्यायालयाने जामीन दिला.पोलीस तपासकार्य गतीने करत आहे त्यामुळे याचा तपासावर कोणताही परिणाम होणार नाही.पेपरफुटीच्या प्रकरणात अजूनही तपास सुरूच असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
●सागर पाटील
पोलीस उपायुक्त अमरावती शहर