जिल्हाधिकाऱ्यांच्या इंग्रजकालीन धोरणांमुळे अभ्यागतांना मानसिक त्रास
●चंदू खेडकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर थेट प्रहार
●विभागीय आयुक्तांकडे केली तक्रार
◆मिररवृत्त
◆अमरावती
अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी अभ्यागतांच्या भेटीची नेमलेली वेळ इंग्रजकालीन धोरणांची अंमलबजावणी करणारी ठरत असून अतिदुर्गम भागातील तसेच ग्रामीण भागातील अभ्यागतांना मानसिक त्रास देणारी ठरत आहे.जिल्हाधिकारी यांनी भेटीसाठी ठरवलेल्या वेळांमुळे न्यायाच्या अपेक्षेने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना एकप्रकारे हुकूमशाहीचा सामना करावा लागत असल्याने प्रहार चे संपर्क प्रमुख चंदू खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या मानसिकतेवर प्रहार करत विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
जिल्ह्यातील अनेक नागरिक आपली कोणती ना कोणती समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. आपल्यावर झालेला अन्याय जिल्हाधिकारी दूर करतील या अपेक्षेने शंभर दीडशे किलोमीटर अंतर कापून एसटी ने किंवा खासगी वाहनाने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात मात्र जिल्हाधिकारी यांनी अभ्यागतांसाठी सकाळी ११ ते १ आणि दुपारी ५ ते ५:३० असा अलिखित नियम बनविल्याने दूरवरून विशेषतः अतिदुर्गम भागातून आलेल्या नागरिकांची घोर निराशा होत आहे. आपली घरचीकामे आटोपून सकाळी १० वाजता निघालेला व्यक्ती ११ ते १ पर्यंत अमरावती पोहचत नाही आणि संध्याकाळी परत जायला वाहन नसल्याने संध्याकाळची ती वेळ त्याला शक्य होत नाही.म्हणजे आल्यापावली त्याला परत जावे लागते.
जिल्हाधिकारीहे सर्व सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असतात त्यामुळे त्यांनी ठरविलेली वेळ समस्या निर्माण करणारी असल्याने अतिदुर्गम भागातील नागरिकांचा तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी अभ्यागतांसाठी वेळ नमूद करावी आणि अश्या इंग्रजकालीन धोरणांचा अवलंब करू नये तसेच कार्यालयाबाहेर भेटीच्या वेळेची पाटी लावून लिखित नियम बनवावा अशी मागणी चंदू खेडकर यांनी विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.