उद्या स्व.माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद
■विविध क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती
■मिररवृत्त
■अमरावती
स्व.माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचे आहे या विषयावर ही स्पर्धा रंगणार आहे. ४ जानेवारी २०२४ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १०:३० वाजता या स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, अपंग व कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू, माजी मंत्री आ.यशोमती ठाकूर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.
या स्पर्धेचे फेसबुक, युट्यूब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेत विजेता संघाला स्व.माणिकराव घवळे स्मृती फिरता चषक प्रदान करण्यात येईल. विषयाच्या अनुकूल व प्रतिकूल बाजूस मते मांडणाऱ्या दोन स्पर्धाचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरेल. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यास ११००१ रु. रोख,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय ७००१ रु.रोख सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व तृतीय पारितोषिक ५००१ रु. रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २००१ रु व १५०१ रु रोख व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे हे २२ वे वर्ष असून, स्पर्धेच्या माध्यमातून महत्वपूर्ण विषयावर मत मांडण्याची संधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. विदर्भ,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील नावाजलेले वादविवादपटू या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.ही स्पर्धा निःशुल्क असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख ,संयोजक प्रफुल्ल घवळे व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.