अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषि प्रदर्शनीचे आयोजन
■२७ डिसेंबर ला उदघाटन
■चार दिवस विविध कार्यक्रमाची मेजवानी
■सोबतच कृषि चर्चासत्र,परिसंवाद आणि चला हवा येऊ द्या व पुन्हा मिरासदारी असे मनोरंजक कार्यक्रम
■मिररवृत्त
■अमरावती
शेतकऱ्यांचे कैवारी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी पहिल्या जागतिक कृषि प्रदर्शनाचे आयोजन १९५९-६० मध्ये दिल्ली येथे केले होते, ही प्रेरणा घेऊन श्री शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या भव्य प्रक्षेत्रात आयोजित ४ दिवसीय कृषि प्रदर्शनाचे आयोजन शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने दि २७ ते ३० डिसेंबर २०२३ रोजी श्री शिवाजी कृषि महाविद्यालय मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात येत असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कृषि महाविद्यालयाने प्रायोगिक तत्वावर फुलवलेली शेती येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बघण्यास मिळणार असून त्या अनुशंगाने त्यांच्या शंका व त्या निमित्ताने आवश्यक असणारी तांत्रिक माहीती व शेती विषयक माहिती येथे तंत्रज्ञ करुन देणार आहेत. जवळपास ७० एकर च्या परिसरामध्ये भव्य प्रदर्शनीचा लाभ समस्त शेतकरी बांधवांनी घेवून अत्याधुनिक शेतीची कास धरावी या उद्देशाने या कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालीत श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती आणि कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अमरावती, सह प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टम्स् लि. द्वारा आयोजित कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय कृषि प्रदर्शनाला कार्यक्रमाध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. धनंजय मुंडे, मुख्य अतिथी म्हणून भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ (भा.कृ.अ.प.) दिल्ली चे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी तसेच विशेष उपस्थितांमध्ये दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु, लोकसभा सदस्य नवनित राणा, लोकसभा सदस्य रामदास तडस, राज्यसभा सदस्य डॉ अनिल बोंडे, विधानसभा सदस्य मा. अॅड. यशोमती ठाकूर, रवि राणा, सुलभाताई खोडके, राजकुमार पटेल,बळवंत वानखडे, प्रताप अडसड, देवेंद्र भुयार, विधान परिषद सदस्य प्रविण पोटे पाटील, किरण सरनाईक, धिरज लिंगाडे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा सौरभ कटीयार (भाप्रसे), मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती अविश्यांत पंडा (भाप्रसे) जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, कृषि प्रदर्शन आयोजन समिती अध्यक्ष दिलीपबाबू इंगोले उपाध्यक्ष, कार्यकारी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करुन आपले उत्पन्न कसे वाढवावे याकरीता या प्रदर्शनीमध्ये नामवंत शास्त्रज्ञ, प्रयोगशील शेतकरी, कृषि व्यावसायिक यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून कृषि विभागाचे व इतर अधिकारी वर्ग भेट देऊन मार्गदर्शन करतील. या प्रदर्शनीमध्ये देशभरातील कृषिशी संबंधित माहिती व तंत्रज्ञान आणि नवनवे प्रयोग शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. त्यामध्ये प्रामुख्याने कृषि उत्पादन तंत्रज्ञान, माती आणि पाणी सिंचन प्रणाली, सुधारित बियाणे व संकरित बियाणे, जैव कीटकनाशके आणि जैव नियंत्रक घटक, जैव तंत्रज्ञान, खते व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठा, दुग्धशाळा उपकरणे आणि उत्पादने, फळे, फुले व भाजीपाला संबंधी हायटेक तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया व पॅकेजिंग, कृषि आधारित मॉडल, माहिती तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकी व अवजारे, सोलर ऊर्जा, कुंपण व जलसिंचन यंत्रणा, बचत गटांचा सहभाग, पशू प्रदर्शनी, देशी विदेशी विविध जातीच्या गायी, म्हशी, शेळी मेंढी, शेतीपूरक उद्योगधंदे याची माहिती तसेच जैन इरिगेशन सिस्टम्स लि. तर्फे हायड्रोपोनिक्सची सविस्तर माहीती शेतकऱ्यांना करुन देण्यात येणार आहे, गांडूळ खत, बायोगॅस बद्दलची माहीती तसेच कृषि तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, ट्रॅक्टर अद्यावत उपकरणे, सिंचन उपकरणे, रिफ्रेशमेंट, उपहारगृह, फुटशन यांचे स्टॉल राहतील.
संस्थेचे श्री शिवाजी कृषि महाविद्यालय हे या प्रदर्शनीचे मुख्य आयोजक असून जैन इरिगेशन सिस्टम्स लि. हे सहप्रायोजक आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावती, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती आणि संस्थेचे श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, श्री शिवाजी कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, जनता कृषि विद्यालय, रुरल इन्स्टिटयुट अमरावती यांचा मुख्य सहभाग असणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचेसह प्रदर्शन आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीपबाबु इंगोले, उपाध्यक्ष गजानन फुंडकर, उपाध्यक्ष भैय्यासाहेब पुसदेकर, सदस्य हेमंत काळमेघ, प्रा.सुभाष बनसोड,सचिव डॉ.विजय ठाकरे प्राचार्य नंदकिशोर चिखले उपस्थित होते.
‘या प्रदर्शनीत विदर्भातील प्रयोगशील शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि उत्पादक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन देशमुख, कृषि प्रदर्शन आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप इंगोले, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड गजाननराव पुंडकर, अॅड. जयवंतराव पाटील (पुसदेकर), केशवराव मेतकर, कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, सुभाषराव बनसोड, सचिव डॉ. वि. गो. ठाकरें, स्विकृत सदस्य डॉ. महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, डॉ. पी.एस. वायाळ, डॉ. अमोल महल्ले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले तसेच कृषि प्रदर्शनी चे आयोजक यांनी केली आहे. अमरावतीत आयोजित हे पहिले राष्ट्रीय कृषि प्रदर्शन समस्त अमरावतीकर आणि विदर्भवासीयांकरीता पर्वणी ठरणार आहे तरी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.’
■चला हवा येऊ द्या, पुन्हा मिरासदारी व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी■
चला हवा येऊ द्या या तुफान लोकप्रिय कार्यक्रमाच्या कलाकारांचा धमाल कार्यक्रम या राष्ट्रीय कृषि प्रदर्शनी मध्ये गुरुवार दिनांक २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.०० वाजता श्री शिवाजी शारीरीक शिक्षण महाविद्यालय येथे होणार असून उपरोक्त कार्यक्रमामध्ये सुप्रसिध्द मराठी कलावंत भारत गणेशपुरे व त्यांच्या सोबत हवा येऊ द्या च्या टीम मधील सुप्रसिध्द विनोदी कलाकार कुशल बद्रिके, सागर कारंडे, योगेश शिरसाट, रोहीत चव्हाण, स्नेहल शिदम, हेमांगी कवी व अंकुर वाढवे आपली कला सादर करुन अमरावतीकरांना मनमुराद हसविण्यास येणार आहेत.
‘शुक्रवार दि. २९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.०० वाजता पुन्हा मिरासदारी हा द.मा. मिरासदार यांच्या कथाकथनावरील कलाविष्कार छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकिय महाविद्यालय परिसर मोर्शी रोड येथे सिध्देश्वर झाडबुके, सक्षम कुळकर्णी, सुश्रुत मंकणी, श्रीकर पित्रे हे नामवंत कलाकार पुन्हा मिरासदारी या कार्यक्रमातुन सादर करणार आहेत. द. मा. मिरासदारांच्या कथा या प्रामुख्याने ग्रामिण जीवनावर विनोदी कथांवर आधारित आहे. पुन्हा मिरासदारी या कार्यक्रमातुन अमरावती करांकरीता एक अनोखी मेजवानी हे कलाकार सादर करणार आहेत. तसेच इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ४ दिवसांमध्ये राहणार आहे.’